पश्चिम रेल्वेवरील विरार लोकल ही प्रचंड गर्दीची मानली जाते.. संध्याकाळच्या वेळेत तर त्यात शिरणं म्हणजे एक प्रकारचं दिव्य असतं.. परंतु ही विरार लोकल बुधवारी संध्याकाळी एका कुत्र्याने तब्बल २० मिनिटे रोखून धरली.. चर्चगेटला महिलांच्या डब्यात हा कुत्रा शिरला आणि त्याने एकच गोंधळ उडवून दिला.
संध्याकाळी चर्चगेट स्थानकातून ६ वाजून ३६ मिनिटांची विरार लोकल सुटली. कार्यालय सुटण्याची वेळ असल्याने ही लोकल खचाखच गर्दीने भरलेली होती. महिलांनीही मोठे दिव्य करत गाडीत जागा पकडली. ट्रेन सुरू होताच अवघ्या काही क्षणात महिलांच्या डब्यात गोंधळ सुरू झाला. महिलांच्या डब्यातील एका सीटखाली एक कुत्रा भेदरून लपला होता. त्याला पाहताच डब्यात एकच तारांबळ उडाली. त्या गदारोळात कुणा जागरूक महिलने चेन खेचली आणि मरिन लाइन्स स्थानकात ही ट्रेन थांबविण्यात आली. रेल्वे सुरक्षा दल आणि पोलीस घटनास्थळी आले, पण कुत्रा काही बाहेर निघायला तयार नव्हता. त्याला काढण्यासाठी पोलिसांनी अनेक शकली लढविल्या. काहींनी बिस्किट आणले, तर काहींनी त्याला बिस्लेरीचे पाणी दिले, पण तो काही केल्या बाकडय़ाखालून बाहेर येतच नव्हता. काठीने त्याला हाकलण्याचाही प्रयत्न केला गेला. अखेर २० मिनिटांच्या प्रयत्नानंतर तो कु त्रा बाहेर पडला आणि फलाटावरून धूम ठोकत पळून गेला. या गोंधळामुळे महत्प्रयासाने मिळालेली जागा गेली म्हणून महिला प्रवाशांमध्ये तूतू-मैमै सुरू झाले होते, तर इतर प्रवासी उशीर झाला म्हणून श्वानाला शिव्यांची लाखोली वाहत होते. संध्याकाळी गर्दीच्या वेळी एखादी गाडी विलंबाने सुटली, तर फलाटावर एका मिनिटात सुमारे शेकडो प्रवाशांची गर्दी वाढते. एका कुत्र्यामुळे चर्चगेटच्या जलद मार्गावरील गाडय़ा २० मिनिटे रखडल्याने पुढील अनेक गाडय़ांच्या प्रवाशांना वाढलेल्या गर्दीचाही फटका सोसावा लागला.
दरम्यान, असा काही प्रकार घडलाच नाही, असा दावा पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी डेव्हिड यांनी केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा