लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला. मात्र रविवारी सुट्टीकालीन वेळापत्रकानुसार लोकल चालवण्यात येत असल्याने, लोकल सेवा उशिराने धावल्या. तर अनेक जलद-धीम्या लोकल रद्द केल्या. परिणामी प्रवाशांना दिलासा मिळण्याऐवजी त्रास सहन करावा लागला.

मध्य रेल्वेच्या वाडीबंदर यार्ड आणि पनवेल रिमॉडेलिंगसाठी रात्रकालीन ब्लॉक सुरू असल्याने रविवारी मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याण मुख्य मार्गिका आणि सीएसएमटी ते पनवेल हार्बर मार्गिकेसह ट्रान्सहार्बर आणि बेलापूर-खारकोपर (बीएसयू) मार्गिकेवर मेगा ब्लॉक नसेल, असे मध्य रेल्वेकडून घोषित केले. मात्र रविवारी सकाळपासून अनेक लोकल रद्द करण्यात येत होत्या. सकाळी १०.४५ वाजेची टिटवाळा-सीएसएमटी जलद लोकल रद्द केली. त्यानंतर लागोपाठ दोन एक्स्प्रेस सोडण्यात आल्या. त्यामुळे प्रवासी स्थानकात ताटकळत उभे राहिले. तसेच मध्य रेल्वेवर दिवसभरात ३५० लोकल फेऱ्या रद्द होणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे. मध्य रेल्वेवर दररोज १,८१० लोकल फेऱ्या धावतात. मात्र सुट्टीकालीन वेळापत्रकानुसार १,४६० फेऱ्या धावतात.

आणखी वाचा-महादेव बुक बेटिंग प्रकरण: ‘ईडी’चे मुंबईसह देशभर छापे

रविवारी पश्चिम रेल्वेवर रविवारी चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान जलद मार्गावर ब्लॉक आहे. ही ब्लॉक सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत असेल. ब्लॉक कालावधीत चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान सर्व जलद मार्गावरील लोकल धिम्या मार्गावर चालवल्या जातील. काही अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात येणार आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Local train cancellation even without mega block mumbai print news mrj
Show comments