ओव्हरहेड वायरमधील बिघाड, रेल्वेरूळांवरून गाडी घसरणे या गोष्टींमुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांत मध्य रेल्वेवर सेवा विस्कळीत होण्याच्या घटना वारंवार घडल्या होत्या. रेल्वेमार्गाच्या देखभाल दुरुस्तीसाठी आवश्यक असलेली मेगाब्लॉकची कामे या दोन महिन्यांत लोकप्रतिनिधींच्या आग्रहामुळे सातत्याने रद्द झाल्यानेच या घटना घडल्याचा दावा मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी केला आहे. उपनगरीय रेल्वेसेवा सुरळीत चालण्यासाठी दर आठवडय़ाला मेगाब्लॉक अनिवार्य आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
आठवडाभर अत्यंत व्यग्र असलेल्या मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी मध्य रेल्वे दर रविवारी मेगाब्लॉक घेते. १० ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण असल्याने, ३१ ऑगस्ट व ७ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव असल्याने आणि १४ सप्टेंबर रोजी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे सकाळी सकाळी गाडी घसरल्याने हे मेगाब्लॉक रद्द झाले होते. रक्षाबंधनाच्या आधी मुंबईतील काही लोकप्रतिनिधींनी रेल्वे प्रशासनावर दबाव टाकत हा मेगाब्लॉक रद्द करण्यास भाग पाडले होते. गणेशोत्सवादरम्यानही लोकप्रतिनिधींनीच दोन रविवार मेगाब्लॉक रद्द करावेत, अशी भूमिका घेतली होती, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. अर्थात असे असले तरी ऑगस्टमध्ये पाचपैकी तीन रविवारी मेगाब्लॉक झाला आणि सप्टेंबरमध्ये रेल्वेचीच गाडी घसरल्याने एक मेगाब्लॉक रद्द करावा लागला आणि तीनऐवजी दोन रविवारी मेगाब्लॉक झाले असतानाही सेवेतील गोंधळाचे खापर मेगाब्लॉक रद्द करण्यावर फोडले जात असल्याने प्रवासी चक्रावले आहेत.रक्षाबंधनानंतर सलग दोन दिवस ११ आणि १२ ऑगस्ट रोजी मस्जिद स्थानकाजवळ हार्बर मार्गावर ओव्हरहेड वायर तुटून वाहतुकीचा खोळंबा झाला. सप्टेंबर महिन्यात तर रेल्वेरुळावरून गाडय़ा घसरण्याचे प्रकार सर्रास घडले आहेत. त्यापैकी दोन घटना सीएसटी यार्ड परिसरात झाल्या. तसेच ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्यानेही अनेकदा गाडय़ा रखडून परिणामी प्रवाशांना मनस्ताप सोसावा लागला आहे.
ब्लॉकअभावी लोकल घसरली
ओव्हरहेड वायरमधील बिघाड, रेल्वेरूळांवरून गाडी घसरणे या गोष्टींमुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांत मध्य रेल्वेवर सेवा विस्कळीत होण्याच्या घटना वारंवार घडल्या होत्या.
First published on: 03-10-2014 at 05:02 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Local train derails