कल्याण ते विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकांच्या दरम्यान शनिवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास अंबरनाथ डाऊन लोकलचा पेंटोग्राफ तुटल्याने कर्जतकडे जाणारी व मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक तब्बल दोन तास ठप्प झाली. जागोजागी लोकल थांबल्याने प्रवासी अडकून पडले. उन्हाची काहिली, त्यात या सततच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात होता.
गेल्या आठवडय़ात शुक्रवारी सकाळच्या वेळेत अंबरनाथ डाऊन लोकलवर ओव्हरहेड वायर तुटून पेंटोग्राफ तुटल्याने या मार्गावरील वाहतूक काही तास ठप्प झाली होती. त्याच ठिकाणी शनिवारी दुपारी पावणेदोन वाजता अंबरनाथ डाऊन लोकलचा पेंटोग्राफ तुटला. या घटनेनंतर अंबरनाथ लोकलमागून येणाऱ्या कर्जतकडे जाणाऱ्या लोकल कल्याण, ठाकुर्ली, डोंबिवली परिसरात थांबविण्यात आल्या. कर्जतकडून मुंबईकडे जाणाऱ्या लोकल बदलापूर, अंबरनाथ परिसरात खोळंबल्या होत्या. लांब पल्ल्याच्या गाडय़ा जागोजागी थांबून ठेवण्यात आल्या होत्या.
कडक उन्हाचे चटके, त्यात लोकलचा टप तापलेला, जवळ पाणी नाही अशा प्रवाशांचे सर्वाधिक हाल झाले. अनेक प्रवाशांनी डोक्याला रुमाल, महिलांनी ओढण्या, साडय़ांचे पदर डोक्यावर घेऊन रेल्वे मार्गातून प्रवास करून जवळचे रेल्वे स्थानक, रिक्षा, वाहनतळ, बस आगार गाठणे पसंत केले. अनेक प्रवाशांनी उन्हाचे चटके नको म्हणून गाडीत आराम करणे पसंत केले. या दोन तासांत काकडी, चिकू, संत्री, भेळ विक्रेत्यांनी तेजीत धंदा केला.
दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात आले होते. हे काम पूर्ण होण्यास चार वाजल़े  त्यानंतर हळूहळू या मार्गावरील वाहतूक पुढे सरकू लागली.

Story img Loader