|| सुशांत मोरे
लोकल प्रवास नसल्याने खासगी कार्यालयीन प्रवाशांचे हाल
मुंबई : दररोज एकू ण ९ ते १० तासांचा प्रवास, २५० ते ३०० रुपये प्रवास खर्च यांबरोबरच शरीर आणि मनाचेही हाल, अशा परिस्थितीत खासगी कार्यालयातील कर्मचारी प्रवास करत आहेत. एरवी लोकलचा कमी पैशात वेळ वाचविणारा प्रवास नोकरी आणि वेतनाचे गणितही जुळवून आणतो. परंतु लोकल प्रवासाची परवानगी नसल्याने महिन्याला पाच ते साडे सात हजार रुपये फक्त प्रवासावरच खर्च होत आहे. दोन ते तीन टप्प्यांत कराव्या लागणा ऱ्या या प्रवासासाठी घरून मानसिक तयारी करूनच निघावे लागते, अशी सार्वत्रिक भावना या प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
वेळ आणि पैसा खर्च होत असल्याने अनेक प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. मी डोंबिवलीला राहतो व अंधेरीत एका खासगी कं पनीत काम करतो. सकाळी १० वाजताचे कार्यालय गाठण्यासाठी घरातून सकाळी ७ वाजता निघतो. यासाठी डोंबिवलीतून शेअर रिक्षाने महापेला आणि महापेतून नवी मुंबई पालिके ची बस पकडून वाशी गाठतो. वाशीवरून घाटकोपरला जाण्यासाठी बेस्ट बस पकडतो आणि तिथून पुन्हा बस पकडून कार्यालयात पोहोचतो, असे उमेश महाडिक या ४८ वर्षीय प्रवाशाने सांगितले. या प्रवासासाठी तीन ते चार तास लागतात. हीच परिस्थिती सायंकाळी कार्यालय ते घर गाठताना असते. यासाठी दरदिवशी साधारण ३०० रुपये प्रवास खर्च येतो. १५ जूनपासून कार्यालयात जाऊ लागलो आहे. साधारण महिन्याला सात ते साडे सात हजार रुपये प्रवास खर्च आला, असे त्यांनी सांगितले.
विरारला राहाणा ऱ्या अंकुश परब या तरुणाचीही ही व्यथा आहे. लोकल नसल्याने अंधेरी किं वा जोगेश्वरीतील कार्यालय गाठण्यासाठी बरीच कसरत करावी लागते. सध्याच्या प्रवासासाठी साधारण अडीच तास लागतात. सकाळी ७ वाजता घर सोडल्यानंतर बसच्या रांगेतच बराच वेळ जातो. विरार रेल्वे स्थानकाबाहेर असलेली एसटी पकडून बोरिवलीला उतरतो आणि बोरिवलीहून बस पकडून सकाळी १० वाजता कार्यालयात पोहोचतो. टाळेबंदीआधी लोकलने हाच प्रवास दीड तासाचा होता. आता तीन तास जास्त मोजावे लागतात. शिवाय दररोज २०० ते २५० रुपये खर्च येतात. महिन्याला ५ हजारपेक्षा जास्त खर्च प्रवासावरच होतो, असे परब यांनी सांगितले.
ग्रॅण्ट रोड येथील खासगी कं पनीत कार्यरत असलेले प्रकाश गोठणकर सकाळी १० वाजता कार्यालयात पोहोचण्यासाठी डोंबिवलीहून सकाळी ६ वाजता निघतात. डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळून मंत्रालयाला जाण्यासाठी बस पकडतात. परंतु बसच्या रांगेतच एक तास जातो. बसने भायखळ्याला उतरतो आणि तिथून पुन्हा बसने गॅ्रण्ट रोडला जातो. सकाळी १० वाजता कार्यालयात कसाबसा पोहोचतो, असे त्यांनी सांगितले.
रस्ते प्रवासापेक्षा रेल्वे प्रवासाचा खर्च कमी
- कल्याण ते सीएसएमटी
- द्वितीय श्रेणी सिंगल प्रवास तिकीट- १५ रुपये
- प्रथम श्रेणी तिकीट-१६५ रुपये
- प्रथम श्रेणी महिन्याचा पास-१,१०५ रुपये
- द्वितीय श्रेणी महिन्याचा पास-३१५ रुपये
- विरार ते चर्चगेट
- द्वितीय श्रेणी तिकीट- २० रुपये
- प्रथम श्रेणी तिकीट-१७० रुपये
- द्वितीय श्रेणी महिन्याचा पास-३१५ रुपये
- प्रथम श्रेणी महिन्याचा पास -१,१८५ रुपये