मध्य, हार्बर आणि पश्चिम या तीनही मार्गासाठी मंगळवार हा गोंधळवार ठरला. मध्य रेल्वेवर दिवसाची सुरुवात डोंबिवली स्थानकात गाडी रुळावरून घसरून झाली. दुपारच्या वेळी ठाण्याजवळ एका उपनगरी गाडीच्या पेंटोग्राफला आग लागली. तर संध्याकाळी मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गाला वादळी पावसाचा तडाखा बसला. या सर्वामुळे या मार्गावरील वेळापत्रक चांगलेच कोलमडले होते.
मध्य रेल्वेमार्गावर सकाळी डोंबिवली येथे डाउन धीम्या मार्गावर टिटवाळा गाडीचा पुढील डबा घसरला. सकाळी ११.३९ वाजता झालेला हा बिघाड २.३५ वाजता दुरुस्त करण्यात यश आले. त्यादरम्यान मध्य रेल्वेमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. या बिघाडामुळे ८ डाऊन आणि १३ अप अशा २१ सेवा रद्द करण्यात आल्या.
संध्याकाळी ठाणे स्थानकाजवळ उभ्या असलेल्या कर्जत लोकलच्या पेंटोग्राफमधून अचानक ठिणग्या आल्या. पेंटोग्राफला लागलेल्या या आगीमुळे ही गाडी १३ मिनिटे जागच्या जागीच उभी होती. त्यामुळे डाऊन धीम्या मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली.
रात्री मुंबई शहर परिसरात पडलेल्या मुसळधार पावसाने मध्य, पश्चिम आणि हार्बर या तीनही मार्गाची त्रेधातिरपीट उडवली. मध्य रेल्वेमार्गावर करीरोड स्थानकातील तिकीट घरावरील पत्रा वादळी वाऱ्यामुळे उडून अप धीम्या मार्गावरील ओव्हरहेड वायरवर पडला. यामुळे अप मार्गावरील वाहतूक परळ ते भायखळा या दरम्यान ६.४० ते ७.४० वाजेपर्यंत अप जलद मार्गावर वळवण्यात आली. परिणामी मध्य रेल्वेमार्गावरील वाहतूक कोलमडली.
हार्बर सेवेच्या डाऊन मार्गावर कॉटन ग्रीन स्थानकाजवळ रेल्वेमार्गावर झाड पडले. संध्याकाळी ७.१० ला झालेल्या या घटनेमुळे हार्बर मार्गावरील विद्युतप्रवाह खंडित झाला. त्यामुळे या गाडीमागे उभ्या असलेल्या काही गाडय़ा खोळंबल्या. मात्र त्यानंतर हार्बर मार्गावरील वाहतूक मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कुर्ला या दरम्यान मुख्य मार्गावरून चालवण्यात येत होती. तिचा फटका मध्य रेल्वेवरील अन्य नियमित गाडय़ांनाही बसला.
तसेच पश्चिम रेल्वेवरही मुंबई सेंट्रल स्थानकात डाउन धीम्या मार्गावर झाड पडल्याने गाडय़ा खोळंबल्या होत्या.
मध्य रेल्वेची घसरण सुरूच!
सप्टेंबर महिन्यात मध्य रेल्वेमार्गावर चार वेळा गाडय़ा रुळांवरून घसरल्या. मुख्य म्हणजे या चारही वेळा गाडय़ा नेमक्या वळणावर किंवा रूळ बदलण्याच्या ठिकाणीच घसरल्या आहेत. सीएसटी यार्ड परिसरात पंजाब मेल आणि हार्बर मार्गावरील उपनगरी गाडी घसरली होती. त्याचप्रमाणे विद्याविहार स्थानकाजवळ पाचव्या मार्गावर लोकमान्य टिळक टर्मिनस-पुरी एक्सप्रेसचा डबा घसरला होता. तसेच दुरांतो एक्सप्रेस यार्डमध्ये जाताना भायखळा येथे घसरली होती. डोंबिवली येथेही रूळ बदलण्याच्या ठिकाणीच मंगळवारी गाडी घसरली. रूळ बदलण्याच्या ठिकाणी लावलेला चाप सातत्याने चोरीला गेल्यामुळे हे अपघात होत असावेत, असा प्रथमदर्शनी अंदाज आहे.
स्वच्छतेसाठी उद्या मेगाब्लॉक
* कधी- गुरुवार, २ ऑक्टोबर २०१४
* कुठे- भायखळा ते विद्याविहार डाऊन धिम्या मार्गावर, सकाळी ११.२० ते दुपारी ३.२०
* परिणाम- सकाळी ११.०४ ते दुपारी ३.२१ या वेळेत छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सुटणाऱ्या डाऊन धिम्या लोकल भायखळा ते विद्याविहार या स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावरून चालविण्यात येणार आहेत. परळ, दादर, माटुंगा, शीव, कुर्ला या स्थानकांवर थांबणार आहेत. येथून पुढे पुन्हा धिम्या मार्गावरून चालविण्यात येणार आहेत.
सकाळी ११.२१ ते दुपारी ३.२५ या कालावधीत ठाण्यापासून अप जलद मार्गावरील सर्व लोकल्स निर्धारित थांब्यांबरोबरच मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला या स्थानकांवर थांबणार आहेत.
* कधी- गुरुवार, २ ऑक्टोबर २०१४
* कुठे- छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कुर्ला डाऊन आणि वडाळा रोड ते वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर, सकाळी ११.१० ते दुपारी ३.१०
* परिणाम- छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून पनवेल, बेलापूर, वाशीच्या दिशेने जाणाऱ्या सर्व गाडय़ांची वाहतूक सकाळी १०.५२ ते दुपारी ३.१३ या कालावधीत छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कुर्ला स्थानकादरम्यान मुख्य मार्गावरून वळविण्यात येणार आहे. या गाडय़ा चिंचपोकळी व करी रोड स्थानकांवर थांबणार नाहीत.
सकाळी १०.४८ ते दुपारी ३.३३ या कालावधीत छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून अंधेरी व वांद्रेसाठी सुटणाऱ्या गाडय़ा आणि सकाळी १०.४० ते दुपारी ४.१३ या वेळेत अंधेरी व वांद्रे येथून छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेने सुटणाऱ्या सर्व गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत.
हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत वांद्रे, अंधेरी येथे जाण्यासाठी मुख्य मार्ग व पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.