मुंबई : हिवाळ्यात दाट धुक्यांमधून वेगात लोकल आणि रेल्वेगाड्या चालवता याव्यात यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने धुके सुरक्षा यंत्राचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. मात्र दुसरीकडे दाट धुक्यात रेल्वे सेवा रखडण्याच्या घटना घडत आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात गुरुवारी सकाळी धुक्याची चादर पसरल्याने लोकल २० ते २५ मिनिटे विलंबाने, तर लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्या कूर्मगतीने धावत होत्या. तसेच पश्चिम रेल्वेवरील लोकलही उशिरा धावत होत्या.

मुंबईसह आसपासच्या भागात किमान तापमानात घट आणि वातावरणात बदल झाल्याने गुरुवारी पहाटे दाट धुके पडले होते. परिणामी, दृश्यमानता कमी होऊन लोकल, एक्स्प्रेस उशिराने धावत होत्या. मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील लोकल १० ते २० मिनिटांनी आणि एक्स्प्रेस ३० ते ४० मिनिटे विलंबाने धावत होत्या. तसेच पश्चिम रेल्वेवरील लोकल १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत होत्या. त्यात पश्चिम रेल्वेवरील तीन सामान्य आणि तीन वातानुकूलित लोकलच्या वेळेत बदल केल्याने प्रवाशांची नेहमीची लोकल चुकली. स्थानकात पोहचल्यावर नेहमीची लोकल पुढे निघून गेल्याचे समजताच प्रवासी प्रचंड संतापले होते.

हेही वाचा… नापास झाल्यामुळे पळालेली मुले मुंबई विमानतळावर सापडली, ‘एआय’च्या मदतीने करायचा होता व्यवसाय

डहाणू, विरार, वसई, कसारा – टिटवाळा, कर्जत – अंबरनाथ विभागात गुरुवारी पहाटे ४ वाजल्यापासून दाट धुके पडल्याने रेल्वे सेवा खोळंबली. रेल्वेच्या कोलमडलेल्या वेळापत्रकामुळे दुपारपर्यंत चर्चगेट, मुंबई सेंट्रल, वांद्रे आणि सीएसएमटी, एलटीटी दिशेकडे येणाऱ्या लोकल आणि रेल्वे विलंबाने धावत होत्या. त्यामुळे लोकलमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती.

हेही वाचा… मुंबई : महापालिकेचे अधिकारी एवढे अतार्किक कसे ? पदपथावरील बोलार्डमधील कमी अंतरावरून उच्च न्यायालयाने फटकारले

धुक्यामुळे कमी दृश्यमानतेत रेल्वेगाड्यांचा वेग सामान्यतः ३०-६० किमी प्रतितास दरम्यान असतो. मात्र धुके सुरक्षा यंत्राच्या वापराने रेल्वेगाडीचा जास्तीत जास्त वेग ७५ किमी प्रतितास असू शकतो. त्यामुळे रेल्वेगाड्यांचा खोळंबा करणारा कालावधी कमी होऊन वक्तशीरपणा वाढेल, असे मध्य रेल्वेकडून स्पष्ट केले होते. मात्र धुक्यातून वेगवान धाव घेणे मध्य रेल्वेला शक्य झाले नसल्याचे गुरुवारच्या घटनेतून दिसून आले.

Story img Loader