मुंबई : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम रेल्वे २० ते ३० मिनिटे उशिराने धावत असल्याने आणि हार्बर मार्गावरील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे प्रवाशांना इच्छितस्थळी पोहचण्यास उशीर झाला. तसेच हार्बर मार्गावर सुमारे ३० मिनिटांसाठी लोकल सेवा खंडित झाली होती.

हेही वाचा >>> गणेशोत्सव कालावधीत एसटीच्या ४,९५३ बस आरक्षित

पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव-कांदिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे सोमवारी सकाळपासून पश्चिम रेल्वेची लोकल सेवा उशिराने धावत होती. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड विलंबयातना सहन कराव्या लागल्या. तसेच नियोजित काही लोकल अंशतः रद्द केल्यामुळे प्रवास रखडला. तसेच वातानुकूलित लोकल १५ ते २० मिनिटे विलंबाने धावत होत्या. प्रवासी वर्गाने प्रचंड संताप व्यक्त केला. कांदिवली-मालाड दरम्यान पायाभूत कामे सुरू असल्याने, या मार्गावर वेगमर्यादा ताशी २० किमी ठेवण्यात आली आहे, असे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सोमवारी सकाळी ११.२७ हार्बर मार्गावरील बेलापूर ते खारघर दरम्यान जाणाऱ्या डाऊन लोकलला ओव्हर हेडद्वारे होणारा पुरवठा खंडित झाला. त्यामुळे मागून येणाऱ्या लोकल खोळंबल्या. त्यानंतर घटनास्थळी रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली. सुमारे एक तासाने म्हणजे दुपारी १२.२३ वाजता विद्युत पुरवठा सुरू झाला. या कालावधीत तीन लोकलचे वेळापत्रक कोलमडले, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.