उपनगरी किमान तिकीट १० रुपये; पासावरही २५ टक्के अधिभाराचा प्रस्ताव

उपनगरी रेल्वेचे किमान तिकीट पाच रुपयांऐवजी दहा रुपये होण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात रेल्वे अधिकाऱ्यांसह झालेल्या बैठकीत जागतिक बँकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनेनुसार मुंबईकरांच्या माथी किमान तिकीट दरात ही दुप्पट दरवाढ लादली जाण्याची चिन्हे आहेत. गेली अनेक वर्षे ८० लाख मुंबईकरांना एवढय़ा कमी किमतीत सेवा देणाऱ्या रेल्वेच्या आर्थिक व्यवस्थेबद्दल जागतिक बँक अधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले. मुंबईकर प्रवाशांवर २५ टक्के अधिभार लावण्याची सूचनाही त्यांनी केली. रेल्वे अधिकाऱ्यांनी ही सूचना थेट रेल्वे बोर्डाकडे पाठवली असून आता अंतिम निर्णय रेल्वे बोर्ड घेणार आहे.
जागतिक बँक अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार अधिभार लागू झाल्यास इतर कर पकडून मुंबईकरांचे किमान तिकीट पाचऐवजी सात रुपये होण्याची शक्यता आहे. रेल्वेचे तिकीट पाचच्या पटीत असल्याने ही रक्कम थेट दहा रुपये एवढी होईल. उपनगरीय सेवेत सुधारणा करण्यासाठी तिकीट दर वाढवण्याची गरज जागतिक बँकेच्या अधिकाऱ्यांनी बोलून दाखवली. मुंबईकर प्रवाशांच्या तिकिटांवर, मासिक व त्रमासिक पासावर २५ टक्के अधिभार लावण्याची सूचना त्यांनी केली आहे. जागतिक बँकेने मुंबईसाठीच्या ‘एमयूटीपी’ या प्रकल्पाच्या पहिल्या दोन टप्प्यांसाठी निधी पुरवला होता. या कर्जाची परतफेड करण्यासाठी हा अधिभार आवश्यक आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

आताचे तिकीट म्हणे नगण्य!

सध्या मुंबईकरांसाठीचे रेल्वे तिकीट अत्यंत नगण्य आहे. मुंबईकर १५ रुपयांत ५० किलोमीटरपेक्षाही जास्त प्रवास करतात. मुंबईत प्रति प्रवासी प्रति किमी किमान १५ पैसे आणि कमाल ४६ पैसे भाडे आकारले जाते. त्यामुळे तिकीट दरवाढीचा आणि अधिभार लावण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. मात्र त्याबाबतचा अंतिम निर्णय रेल्वे बोर्डातच होणार असल्याचे एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले.

Story img Loader