मध्य रेल्वे पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. रोज म.रे.(मध्य रेल्वे) त्याला कोण रडे? अशी आता लोकलने ऑफिस गाठणाऱ्यांची अवस्था झाली आहे. मागच्या आठवड्यात मध्य रेल्वेने जंबो ब्लॉक घेतला होता. त्यानंतर मध्य रेल्वेची लोकलसेवा रुळावर यायला पुढचे दोन ते तीन दिवस गेले होते. अशात आज पुन्हा एकदा मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याणहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल उशिराने

सिग्नल मिळत नसल्याने अनेक लोकल कल्याण स्थानकांतच उभ्या राहिल्या होत्या. सकाळी ६ वाजून १२ मिनिटांची लोकल ६.२८ पर्यंत स्थानकात उभी होती. या गोष्टीमुळे ऑफिस गाठणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईकरांच्या ऑफिसमधला लेट मार्क आज ठरला आहे असंच चित्र आहे.

चाकरमान्यांचे आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही हाल

मुंबईत कामाच्या निमित्ताने जाणारे अनेक मध्यमवर्गीय, चाकरमानी हे बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळा, कल्याण, डोंबिवली, ठाणे अशा उपनगरांमधून मुंबई गाठत असतात. लोकल हे त्यांच्या प्रवासाचं प्रमुख माध्यम आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वे सातत्याने रखडत असल्याचा फटका या सगळ्याच प्रवाशांना बसतो आहे. पाऊस पडल्यानंतर एक दिवसातच म्हणजेच सोमवारच्या दिवशीही मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं होतं. आता दुसऱ्या दिवशीही तशीच अवस्था पाहण्यास मिळते आहे.

ठाणे, मुंबई, पालघर या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

हवामान विभागाने, ठाणे, मुंबई, पालघर, रायगड या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांनाही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर या जिल्ह्यांना आयएमडीने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. याशिवाय राज्यभरात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज कायम आहे. त्यामुळे पावसाचा परिणाम लोकल सेवेवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Local trains from kalyan to csmt delayed by 15 minutes rno news scj