मुंबई : शुक्रवारी पहाटे धुक्यामुळे मध्य रेल्वेवरील लोकल शुक्रवारी पहाटेपासूनच ३० ते ४० मिनिटे विलंबाने धावत होत्या. परिणामी, त्याचा फटका नोकरदार, व्यावसायिकांना बसला.मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, भुसावळ विभागात पहाटे दाट धुके पडल्याने दृश्यमानता कमी झाल्यामुळे मोटरमन आणि लोको पायलटला रेल्वेमार्ग दिसणे अवघड झाले होते. त्यामुळे मुंबईसह इतर सर्व विभागांतील रेल्वे कमी वेगाने धावत होत्या.
तर, मुंबई महानगरातील लोकल पहाटेपासून ३० ते ४० मिनिटे उशिराने धावत होत्या. दुपारी २ वाजतापर्यंत परिस्थिती ‘जैसे थे’ होती. इतर विभागातून मुंबई उपनगरीय मार्गावर येणाऱ्या रेल्वेगाड्यांना प्राधान्य दिल्याने अनेक लोकल बराच वेळ एकाच ठिकाणी उभ्या होत्या. तसेच अनेक लोकल उशिराने धावत होत्या.‘पहाटेच्या धुक्यामुळे १० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या’, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.