हार्बर मार्गावर सोमवारी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या एका गाडीच्या चाकात पत्र्याचा तुकडा अडकल्याने ही गाडी वडाळा स्थानकात तब्बल अर्धा तास अडकून पडली. त्यामुळे हार्बर मार्गावरील गाडय़ा संध्याकाळी अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत होत्या.
गाडीच्या चाकात पत्र्याचा तुकडा अडकल्याचे लक्षात आल्याने अशा परिस्थितीत गाडी चालवणे धोकादायक होते. त्यामुळे  ही गाडी तब्बल अर्धा तास वडाळा स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरच थांबवण्यात आली. हा बिघाड दुरुस्त होण्यासाठी तब्बल अर्धा तास लागला. साडेचारच्या सुमारास ही गाडी वडाळा स्थानकात रद्द करून सानपाडा येथील कारशेडमध्ये नेण्यात आली. या घटनेमुळे चार पनवेल आणि एक वाशी आणि एक अंधेरी अशा सहा फेऱ्या तब्बल अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत होत्या. मुंबईकडून निघालेल्या गाडय़ा एकामागोमाग एक उभ्या राहिल्या होत्या. संध्याकाळी गर्दीच्या वेळीच ही घटना घडल्याने प्रवाशांचे हाल झाले. अशा प्रकारे पत्र्याचा तुकडा चाकात अडकणे ही गंभीर घटना आहे. या घटनेबाबत स्थानक अधीक्षक आणि रेल्वेच्या अभियांत्रिकी विभाग यांच्याकडून माहिती मागवून चौकशी करण्यात येणार असल्याचे रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अतुल राणे यांनी सांगितले.

Story img Loader