* हार्बर मार्गावरील दुर्घटना
* गरम तेल अंगावर पडल्याने प्रवाशांमध्ये घबराट

अंधेरी येथून हार्बर मार्गे छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे येत असलेल्या उपनगरी गाडीच्या दुसऱ्या डब्याखालील ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन त्यातील गरम तेल अंगावर उडाल्याने ११ जण भाजल्याची घटना मंगळवारी घडली. ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या घटनेमुळे प्रवाशांमध्ये घबराट उडाली. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.
अंधेरी-सीएसटी ही उपनगरी गाडी सकाळी ११.२०च्या सुमारास डॉकयार्ड रोड स्थानकात शिरत असलेल्या मोटरमनच्या डब्यापासून दुसऱ्या डब्याखालील ट्रान्सफार्मरचा अचानक स्फोट झाला. यामुळे डब्याखाली असलेल्या कूलन्ट प्लान्टमधील तेल दोन्ही बाजूने वर उसळले. गरम तेल अंगावर पडल्याने आणि स्फोटाचा आवाज आल्याने घाबरलेल्या प्रवाशांनी फलाटावर उडय़ा मारल्याच; पण विरुद्ध बाजूला दरवाजात उभ्या असलेल्या प्रवाशांनीही शेजारच्या रुळांवर उडय़ा टाकल्या. फलाटाच्या बाजूस उडालेले तेल फलाटाच्या खालच्या बाजूला अडले. पण फलाटाच्या विरूद्ध बाजूस असलेले प्रवासी जास्त होरपळले. जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने जेजे रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. घटनेचे गांभीर्य ओळखत डॉकयार्ड स्थानकाचे प्रमुख व इतर प्रवाशांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. जखमींपैकी तिघे ४५ टक्के होरपळले आहेत. संबंधित गाडीचे मोटरमन सुबोध महाले यांनी गाडी तशीच सावधगिरी बाळगत छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत आणली. या स्फोटाने गाडीच्या डब्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले नसले तरी डबा बाहेरून काळा पडला आहे.
जखमींची नावे पुढीलप्रमाणे : सय्यद अकबर (२९), गणेश मौर्या (२५), मोहम्मद अहमद शएख (३६), हुडास  हुसैन (२६), स्वप्नील केळुसकर (२०), संदीप पाटील (२१), तजिरूल  फितुरशेक इस्लाम (१८), शेख अब्दुल्लाह (१९), विराज हुसैन (१६) आणि मोहम्मद हुसैन शेख (१६). या व्यतिरिक्त रामचंद्र नागवेकर (५४) यांचाही उजवा हात काही प्रमाणात भाजला असून त्यांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले. जखमींना रेल्वेकडून पाच ते २५ हजार रुपये भरपाई  देण्यात
आली.     

आग लागली की नाही?
ट्रान्सफार्मरचा स्फोट झाल्यावर कूलन्ट प्लान्टमधील तेल उंच उडून प्रवासी होरपळल्याचे रेल्वेकडून सांगण्यात येत असले तरी प्रवासी आग लागल्याचे ठामपणे सांगत आहेत. गरम तेल उडाल्यानंतर तेथे काही काळ आग लागली होती. त्यामुळेच प्रवासी होरपळले असे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. डब्याच्या बाहेरचा काही भाग काळा पडला असला तरी तो जळालेला नाही, असे रेल्वेचे अधिकारी सांगत आहेत. मात्र आग लागली नव्हती, तर अग्निशमन दलाच्या गाडय़ा कोणी आणि का बोलावल्या यावर मात्र रेल्वे मौन बाळगून आहे.

गाडी आधीपासूनच सदोष
अंधेरीहून सुटलेली अपघातग्रस्त गाडी आधीपासूनच नादुरूस्त होती. ‘रीट्रोफिटेड’ (जुने डबे एकत्र करून वापरात आणलेली गाडी) असलेली ही गाडी सकाळपासून रडतखडतच सुरू होती. अंधेरीहून निघतानाच त्या गाडीचा एक पेंटोग्राफ नादुरूस्त होऊन खाली आला. त्यामुळे गाडी माहीमपासून केवळ दोन पेंटोग्राफच्या साहाय्याने आणण्यात येत होती. त्यासाठी मोटरमनने तंत्रज्ञालाही सोबत घेतले होते. अधूनमधून गाडीचा पेंटोग्राफ वर उचलण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. डॉकयार्ड रोड येथे गाडी आणत असताना त्याचा प्रयत्नात स्फोट झाला. गाडीतील ट्रान्सफार्मरवर अतिरिक्त दाब आला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र पेंटोग्राफ आणि ट्रान्सफार्मरचा परस्परांशी संबंध नसल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

रीट्रोफिटेड गाडय़ांचा प्रश्न कायम
मध्य रेल्वेच्या ताफ्यामध्ये सध्या १४ रीट्रोफिटेड गाडय़ा असून त्यांच्यात मोठय़ा प्रमाणात तांत्रिक दोष वारंवार उद्भवत असतात. जुन्या, वापरात नसलेल्या, कारशेडमध्ये भंगार म्हणून ठेवलेल्या गाडय़ांमधील पुनर्वापरात येणारे भाग घेऊन त्यांची पुनर्बांधणी केलेली असते. मध्य आणि पश्चिम रेल्वेकडे नव्या गाडय़ा उपलब्ध नव्हत्या तेव्हा गरज म्हणून अशा रीट्रोफिटेड गाडय़ांचा वापर करण्याची कल्पना मांडण्यात आली. अशा गाडय़ांनी प्रवासी वाहतूकही सुरळीत होत असल्याचे निदर्शनास आल्यावर जोपर्यंत नव्या गाडय़ा पूर्ण संख्येने येत नाहीत तोपर्यंत याच गाडय़ांचा वापर करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते.

पश्चिम रेल्वेवरही गाडीत बिघाड
लोअर परळ येथे मंगळवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास जलद मार्गावरून बोरिवलीकडे जाणाऱ्या उपनगरी गाडीत तांत्रिक बिघाड होऊन गाडी २० मिनिटे जागीच उभी होती. यामुळे या गाडीच्या मागे असलेल्या पश्चिम रेल्वेच्या अनेक गाडय़ा मार्गातच खोळंबल्या होत्या. गाडीतील तांत्रिक बिघाड दूर झाल्यावर वाहतूक पूर्ववत झाली, तरी दुपापर्यंत काहीशा धीम्या गतीनेच सुरू होती.

Story img Loader