मुंबई : उद्योगजगतातील आणखी एका प्रतिथयश कुटुंबाला तडा गेला असून अभिषेक आणि अभिनंदन लोढा बंधूंमध्ये लोढा हे नाव वापरण्यावरून सुरू असलेला वाद आता उच्च न्यायालयात पोहोचला आहे. धाकट्या भावाला लोढा हे नाव वापरण्यापासून रोखण्याच्या मागणीसाठी अभिषेक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिषेक लोढा यांच्या मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेडने गेल्या आठवड्यांत अभिनंदन यांच्या हाऊस ऑफ अभिनंदन लोढा या कंपनीविरोधात याचिका केली. त्यात, लोढा या व्यापारचिन्हाचे स्वामित्त्वहक्क आपल्याकडे असून इतर कोणीही ते वापरू शकत नाही. त्यामुळे, लोढा हे व्यापारचिन्ह वापरण्यापासून अभिनंदन आणि त्यांच्या कंपनीला कायमची मनाई करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

हेही वाचा : ५ लाख कोटींचे करार, दावोस परिषदेत राज्यात विक्रमी गुंतवणुकीची चिन्हे

न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या एकलपीठासमोर मंगळवारी सकाळच्या सत्रात अभिषेक यांची याचिका सर्वप्रथम सुनावणीसाठी आली. तथापि, अभिषेक यांनी पाच हजार कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईच्या दाव्याची मागणी केली असल्याने त्यांच्या याचिकेवर आपण सुनावणी घेऊ शकत नाही, असे न्यायमूर्ती पितळे यांनी स्पष्ट केले. त्यानंतर, शंभर कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान भरपाईची मागणी करणाऱ्या याचिकांवर सुनावणी घेणाऱ्या न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या एकलपीठापुढे दुपारच्या सत्रात अभिषेक यांची याचिका सादर करण्यात आली.

सुनावणीच्या वेळी एकलपीठाने हा वाद दोन भावांमधील भांडणाशी संबंधित आहे का? अशी विचारणा अभिषेक यांच्या वकिलांकडे केली. त्याला सकारात्मक उत्तर देऊन अभिषेक आणि अभिनंदन यांच्या लोढा या व्यापारचिन्हावरून वाद सुरू असल्याचे अभिषेक यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. त्यानंतर, एकलपीठाने प्रकरणाची सुनावणी २७ जानेवारी रोजी ठेवताना त्यावेळी अंतरिम दिलासा देण्याच्या मागणीवर युक्तिवाद ऐकण्याचे स्पष्ट केले.

हेही वाचा : मालेगाव प्रकरणी सॉफ्टवेअर आयातीच्या नावाखाली व्यवहार, अमेरिका, सिंगापूर, यूएईमधील कंपन्यांना कोट्यवधीची रक्कम पाठवली

ना हरकत दिलेली नाही

आपल्या कंपनीकडे लोढा व्यापारचिन्हाचे नोंदणीकृत मालकीहक्क आहेत. तसेच, याआधी किंवा आजपर्यंत अभिनंदन यांच्या कंपनीला हाऊस ऑफ अभिनंदन लोढा हे नाव वापरण्यास आपण ना हरकत दिली नसल्याचा दावा अभिषेक लोढा यांनी याचिकेत केला आहे. लोढा हे नाव सर्वदूर करण्यासाठी गेल्या चार दशकांपासून कंपनीने प्रयत्न केले आहेत. तसेच, त्यासाठी कंपनीने एकाच दशकात १,७०० कोटी रुपये खर्च केले आहेत. लोढा समुहाचे नाव प्रतिष्ठित मानले जाते आणि कंपनीने गेल्या दशकात देशांतर्गत मालमत्ता विक्रीतून ९१,००० कोटी रुपये कमावले आहेत. लोढा समुहाने जाहिरातीवर कोट्यवधी खर्च केले आहे, असा दावाही अभिषेक यांनी केला आहे.

दावा काय ?

● मॅक्रोटेक डेव्हलपर्सने याचिकेत ती लोढा समुहाची प्रमुख कंपनी असल्याचा दावा आहे. लोढा समुहातील कंपन्या व्यापारचिन्हाचा वापर करू शकतील, असा करार २०१५ पर्यंत होता.

हेही वाचा : एसटीच्या कंत्राटी बस निविदा रद्द, नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

● २०१५ मध्ये, अभिनंदन लोढा हे लोढा समुहापासून वेगळे होतील आणि स्वत:चा व्यवसाय सुरू करतील असा निर्णय घेण्यात आला.

● मार्च २०१७ मध्ये आणि नंतर २०२३ मध्ये वेगळे होण्याच्या अटी निश्चित करण्यात आल्या. त्यानुसार, अभिनंदन यांची कंपनी हाऊस ऑफ अभिनंदन लोढा नावाने काम करेल, असा निर्णय घेण्यात आला.

● २०२३ मध्ये झालेल्या करारात आपण सहभागी नव्हतो. त्यामुळे, त्यातील अटींना बांधील नसल्याचा दावाही अभिषेक यांच्या मॅक्रोटेक डेव्हेलपर्सने केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lodha family dispute between abhishek lodha and abhinandan lodha for lodha name for business css