कोकण रेल्वेवरील स्थानके आणि या मार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी लवकरच लोहमार्ग पोलिसांवर सोपविण्यात येण्याची शक्यता आहे. या मार्गावरील तीन स्थानकांमध्ये पोलीस ठाणे स्थापन करण्यासाठी लोहमार्ग पोलिसांनी राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केला आहे. स्थानके, तसेच प्रवाशांच्या सुरक्षेची बाब लोहमार्ग पोलिसांच्या कक्षेत आल्यानंतर गुन्ह्यांचा तपास करणे सोपे होईल, असा विश्वास लोहमार्ग पोलिसांकडून व्यक्त होत आहे.
हेही वाचा- मुंबईतील एक तरी पदपथ चालण्यायोग्य आहे का? फेरीवाल्यांवरून उच्च न्यायालयाचे महानगरपालिकेवर ताशेरे
मुंबई उपनगरीय रेल्व हद्दीतील स्थानके, प्रवाशांची सुरक्षा आणि गुन्ह्यांचा तपास करण्याची जबाबदारी लोहमार्ग पोलिसांवर आहे. रेल्वेच्या मालमत्तेची सुरक्षा रेल्व सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) अखत्यारित आहे. सध्या लोहमार्ग पोलिसांची हद्द सीएसएमटी ते पनवेल आणि कर्जत, खोपोली, मंकी हिलपर्यंत आहे. रोह्यापासून पुढे कोकण रेल्वेची हद्द सुरू होत असून या हद्दीतील सुरक्षेची जबाबदारी रेल्वे सुरक्षा दलावर आहे. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाडीत कोकण रेल्वे स्थानकांदरम्यान एखादा गुन्हा घडल्यानंतरही त्याबाबतची तक्रार प्रवासी मुंबईत आल्यानंतर करतात. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दल, स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून गुन्हा संबंधित यंत्रणेकडे वर्ग करण्याचे काम लोहमार्ग पोलिसांना करावे लागते. कोकण रेल्वेच्या हद्दीतून प्रवास करताना लोहमार्ग पोलिसांच्या हेल्पलाईनवर महिलांची छेडछाड, विनयभंग किंवा अन्य मारहाणीच्या तक्रारी येतात. मात्र या हद्दीत लोहमार्ग पोलीस नसल्याने रेल्वे सुरक्षा दलाशी संपर्क साधून कारवाई करावी लागते.
हेही वाचा- राहुल गाधींच्या वक्तव्याविरोधात शिंदे गट आक्रमक; मुंबईत निषेध मोर्चा, घोषणाबाजी!
आपल्या हद्दीतील स्थानके, तसेच प्रवाशांची सुरक्षा व घडणाऱ्या गुन्ह्यांचा तपास करता यावा यासाठी कोकण रेल्वेवरील तीन स्थानकांमध्ये पोलीस ठाणे स्थापन करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आल्याची माहिती लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी दिली. रोहा, रत्नागिरी आणि कणकवली येथे महत्त्वाची तीन पोलीस ठाणी स्थापन करण्यात येतील आणि या पोलीस ठाण्यांच्या अखत्यारित अन्य स्थानकांचा समावेश करण्यात येईल. त्यासाठी वरिष्ठ दर्जाचे अधिकारी, तसेच कर्मचारी आदी मनुष्यबळही उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे.
हेही वाचा- पुणे-मुंबई मार्गावरील बहुतांश रेल्वे उद्या रद्द; आज आणि सोमवारीही वाहतुकीवर होणार परिणाम
कोकण रेल्वेच्या स्थानकांमध्ये लोहमार्ग पोलिसांचे मनुष्यबळ
कोकण रेल्वे स्थानक आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ३१ अधिकारी, ८७८ अंमलदारांची गरज आहेत. तीन पोलीस ठाणे उभारणीसाठी एक कोटी २१ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.