मुंबई : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच मुंबई काँग्रेसमधील काही नेते पक्षातून बाहेर पडत आहेत. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांना पक्षातून काढून टाकण्यात आले असले तरी त्यांनी स्वत: पक्षाचा राजीनामा देत काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वार हल्लाबोल केला.
माजी खासदार मिलिंद देवरा व माजी आमदार बाबा सिद्दीकीही पक्षातून बाहेर पडले. त्यामुळे मुंबईत काँग्रेससमोर सध्या आव्हानात्मक परिस्थती निर्माण झाली आहे. मुंबईतील पक्षांतर्गत घडामोडीवर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष प्रा. वर्षा गायकवाड यांनी निरुपम यांच्यासारखे लोक पक्षातून गेले तरी काही फरक पडत नाही, काँग्रेस पक्ष लढेल आणि जिंकेल अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. काँग्रेस नेतृत्वावर टीका करणाऱ्या निरुपम यांचा त्यांनी खरपूस समाचार घेतला.
हेही वाचा >>>महायुतीमधील पेच कायमच; रत्नागिरी, सातारा, ठाणे, मुंबईतील तीन उमेदवारांच्या घोषणेची प्रतीक्षा
मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघातून संजय निरुपम यांची निवडणूक लढविण्याची इच्छा होती. परंतु महाविकास आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला सोडण्यात आला. त्यामुळे नाराज झालेल्या निरुपम यांनी काँग्रेसवर जाहीरपणे टीका करायला सुरुवात केली. विशेष म्हणजे त्यांचा प्रदेश काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत पक्षाने समावेश केला होता. परंतु त्यांनी पक्षावरच टीका करायला सुरुवात केल्यामुळे त्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी आपण पक्षाचा राजीनामा देत असल्याचे सांगत, पक्षाच्या नेतृत्वावर व विचारसरणीवर सडकून टीका केली.