मुंबई : उत्तर मुंबई मतदारसंघातील भाजप उमेदवार पियूष गोयल, उत्तर मध्य मुंबईमधील काँग्रेसच्या वर्षां गायकवाड आणि ईशान्य मुंबई मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे संजय दिना पाटील यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बोरीवली (पूर्व) येथील प्रसिद्ध श्री पुष्टीपती गणेशाचे दर्शन घेऊन उत्तर मुंबई लोकसभा मतदासंघांतील भाजप आणि महायुतीचे उमेदवार पियूष गोयल यांनी मंगळवारी वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासमवेत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार गोपाळ शेट्टी आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष अ‍ॅड. आमदार आशिष शेलार, आमदार योगेश सागर आदी मान्यवर उपस्थित होते. गोयल यांनी खास कोळी टोपी परिधान केली होती.

गेल्या दोन वर्षांत राज्यात महायुती सरकारने केलेले काम आणि दहा वर्षांत केंद्रातील भाजप सरकारने केलेल्या कामाची पोचपावती मतदार देतील आणि पाठीशी उभे राहतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी प्रसिद्धिमाध्यमांना सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद आहेत. देशाची सुरू असलेली विकासयात्रा यापुढेही सुरू राहील. उत्तर मुंबईची आपण उत्तम मुंबई करणार असून पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, शिक्षण, आरोग्य अशा सर्वच क्षेत्रात विकासकामे करणार असल्याचे गोयल यांनी नमूद केले.

हेही वाचा >>> उद्धव ठाकरे यांचा भाजपाला जाहीर इशारा; म्हणाले, “याद राखा…”

शक्तिप्रदर्शन करीत वर्षां गायकवाड यांचा अर्ज दाखल

उत्तर- मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातील काँग्रेस उमेदवार वर्षां गायकवाड यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी गायकवाड यांनी खेरवाडी जंक्शन ते वांद्रे पूर्व येथील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रोड शो करत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. अर्ज दाखल करण्यापूर्वी गायकवाड यांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. तसेच दिक्षाभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. माहीम दर्गा आणि माहीम चर्च येथे जावून प्रार्थना केली. या वेळी माजी खासदार प्रिया दत्त, माजी मंत्री अस्लम शेख उपस्थित होते.

प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना गायकवाड म्हणाल्या की, मुंबई काँग्रेसमध्ये कोणतेही वाद नाहीत. सर्व नेत्यांशी चर्चा झाली असून कोणतीही नाराजी नाही. सर्वजण एकत्रितपणे निवडणुकीला सामारे जाणार आहोत.

ईशान्य मुंबईत संजय पाटील यांचा अर्ज दाखल

शक्तिप्रदर्शन करीत ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी विक्रोळी येथील निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे तसेच महाविकास आघाडीचे प्रमुख नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

उमेदवारी दाखल करण्यापूर्वी पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांदीच्या पुतळयांना अभिवादन केले. त्यानंतर जोरदार प्रचारयात्रा काढत उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रचारफेरीत सर्व धर्मीय कार्यकर्ते पारंपरिक वेषभुषेत सहभागी झाले होते.  देशात लोकशाही धोक्यात आहे. महाविकास आघाडीसाठी चांगले वातावरण असून महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त जागा येतील असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला. तर मानखुर्द येथील दगडफेक प्रकरणाशी आमचा काहीही संबंध नसल्याचे संजय पाटील यांनी स्पष्ट केले.

पियूष गोयल व कुटुंबीयांची १२४ कोटींची मालमत्ता

भाजपचे उत्तर मुंबईतील उमेदवार पियूष गोयल, त्यांची पत्नी आणि कुटुंबाची मालमत्ता १२३ कोटी ९७ लाख रुपयांची आहे. गोयल यांनी पत्नीला १४.१२ कोटी रुपयांचे कर्ज दिले असून अग्रीम भाडयापोटी १० लाख ३५ हजार रुपये दिले आहेत.’ एकूण मालमत्ता : १२३.९७ कोटी ’ एकूण जंगम मालमत्ता (मुदतठेवी, समभाग, रोख व अन्य)  : ८९ कोटी ८६ लाख ’ स्थावर मालमत्ता (पत्नी) : १३,०१,७७,७६८ रुपये ’ स्वकष्टार्जित मालमत्ता (पत्नी) – १३,३८,३०,००० रुपये ’ सोने : ९०५४.४२ ग्रॅम ’ चांदी : २५ किलो, ’ सोने-चांदी बाजारभावाने किंमत – ७,८०,६८,६६६ ’ राज्यसभेसाठी २०२२ मध्ये लढविलेल्या निवडणुकीच्या वेळी  एकूण मालमत्ता : ९९.८३ कोटी रुपये.

वर्षां गायकवाड यांच्याकडे वाहन नाही

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार वर्षां गायकवाड यांच्या मालमत्तेत गेल्या पाच वर्षांत तीन कोटींनी वाढ झाली आहे. त्यांच्याकडे कोणतेही वाहन नाही.

*एकूण मालमत्ता : सुमारे ७ कोटी ६६ लाख. ’  जंगम मालमत्ता : तीन कोटी ९६ लाख. यात गायकवाड यांची एक कोटी ९६ लाख, तर पतीची दोन कोटी १० लाख. यामध्ये १० तोळे सोन्याचे दागिने, बँकेतील ठेवी  ’ स्थावर मालमत्ता : सुमारे तीन कोटी ७० लाख असून  मावळ येथे ११ लाखांची शेतजमीन, अंजूर दिवे भिवंडी येथे एक कोटी ५४ लाखांचे गोदाम. मालाड मढ रोड आणि प्रतीक्षानगर येथील घरांचा समावेश. * कर्जे : वर्षां गायकवाड यांच्यावर एक कोटींचे कर्ज

संजय पाटील चार कोटींचे धनी

ईशान्य मुंबई मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पाटील चार कोटींचे धनी असूनही त्यांच्याकडे स्वत:च्या मालकीचे वाहन नाही. * एकूण मालमत्ता : सुमारे चार कोटी ’ जंगम मालमत्ता: तीन कोटी ८१ लाख. यात पाटील दोन कोटी ३० लाख, तर पत्नीची ४२ लाख तर दोन्ही मुलींची मिळून सुमारे एक कोटींची मालमत्ता आहे. यामध्ये ४६ तोळे सोने असून त्यातही पत्नीकडे ३० तोळे सोन्याचे दागिने आहेत.तसेच बँकेतील ठेवी, वित्तीय संस्थामधील गुंतवणुकीचा समावेश आहे. ’ स्थावर  मालमत्ता: १८ लाख. भांडुप गाव येथे २२५ चौरस फुटांची खोली असून ५१ हजार रुपयांना खरेदी केलेल्या या खोलीची आजची किंमत १८ लाख रुपये असून एवढीच त्यांची स्थावर मालमत्ता आहे

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha election 2024 piyush goyal varsha gaikwad and sanjay patil files nomination for mumbai seats zws