मुंबई : भाजपने राज्यातील २३ उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली असली तरी पक्षाच्या खासदार पूनम महाजन यांच्या उमेदवारीचा अद्यापही निर्णय घेतलेला नाही. महाजन यांना उमेदवारी नाकारल्यास उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून उमेदवारी द्यायची कोणाला या पर्यायांवर पक्षात विचारविनिमय सुरू असल्याचे समजते.
हेही वाचा >>> मुंबईतील ‘या’ लोकसभा मतदारसंघातून मराठी अभिनेत्रीला मिळणार उमेदवारी? शिंदे गटाची रणनीती
उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाबाबत पक्षाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. मुंबईतील पक्षाचे सध्या तीन खासदार आहेत. यापैकी गोपाळ शेट्टी आणि मनोज कोटक या दोन्ही विद्यमान खासदारांना पक्षाने पुन्हा उमेदवारी नाकारली आहे. पूनम महाजन यांच्याबाबत पक्षाने अद्यापही निर्णय घेतलेला नाही. पूनम महाजन यांच्या जागी आशिष शेलार यांच्या नावाची चर्चा असली तरी शेलार दिल्लीत जाण्यास फारसे उत्सुक नाहीत. यातूनच पर्यायांबाबत विचार सुरू असल्याचे समजते. मुंबईत २० मे रोजी निवडणूक असून, २६ एप्रिल ते ३ मे या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत निर्णय अपेक्षित आहे.