मुंबई : गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील जनतेने सत्तासंघर्षांचे विविध अंक पाहिले. राजकीय पक्षांमधील फूट, दिग्गज नेत्यांचे बंड, सत्तेसाठी जुळलेली अनपेक्षित समीकरणे आणि अभूतपूर्व सत्तांतर पाहून महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाची चिरफाड झाली अशी भावना जनतेच्या मनामध्ये निर्माण झाली होती. या अनपेक्षित राजकीय घडामोडींचे पडसाद मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघातील मतदानावर उमटले. राज्यातील सत्तासंघर्षाला कंटाळलेल्या जवळपास ७० हजारांहून अधिक मुंबईकरांनी ‘नोटा’चा पर्याय स्वीकारणे पसंत केले.
हेही वाचा >>> शिवडीतील मतमोजणी केंद्र परिसरात सर्प दर्शन; सर्पमित्रांच्या मदतीने १२ सापांची सुरक्षीतस्थळी हलवले, त्यानंतर पार पडली मतमोजणी
मुंबईतील सहापैकी पाच जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय खेचून आणत महायुतीला धक्का दिला. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून विजय संपादन करीत मुंबईत भाजपकडून महायुतीचे खाते उघडले. मात्र, मुंबईकरांनी इतर पाच लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांना सपशेल नाकारल्याचे चित्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात पाहायला मिळाले. तसेच, ‘नोटा’च्या पर्यायाला मिळालेल्या मतांनीही सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात तब्बल १३ हजार २२१, दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात १३ हजार ४२३, उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात ९ हजार ३४५, उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात १३ हजार ९३७, उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात १२ हजार ९३४ आणि ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात ९ हजार ८९४ मतदारांनी सर्व उमेदवारांना नापसंती दर्शवत ‘नोटा’चा पर्याय स्वीकारल्याचे मतमोजणीअंती निदर्शनास आले.