संतोष प्रधान, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई :  राज्यसभेचे नेते, गेले दहा वर्षे विविध महत्त्वाची खाती बजाविलेले आणि एकेकाळी भाजपच्या तिजोरीच्या चाव्या ताब्यात असणाऱ्या पीयूष गोयल यांनी तीन वेळा मागील दाराने म्हणजे राज्यसभेत प्रवेश केला होता. यंदा प्रथमच लोकांमधून म्हणजेच लोकसभेच्या रिंगणात पक्षाने त्यांना उतरविले आहे. राजकारणात काही जण खूपच नशीबवान असतात, त्यात गोयल यांचा समावेश होतो. कारण लोकसभेसाठी दक्षिण मुंबई हा त्यांचा वास्तव्याचा मतदारसंघ सोडून उत्तर मुंबई हा सोपा मतदारसंघ त्यांनी निवडला आणि पक्षाने त्याला संमती दर्शविली.

हेही वाचा >>> CAA वर प्रश्न उपस्थित करणाऱ्या पाश्चात्य देशांना परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी दाखवला आरसा, म्हणाले…

यातूच पुढील दाराने म्हणजे लोकसभेतील त्यांचा प्रवेश सुखकर होईल अशीच चिन्हे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी वा भाजपचे अन्य नेते घराणेशाहीवर नाके मुरडत असले तरी पीयूष गोयल हे घराणेशाहीच्या राजकारणातूनच पुढे आलेले नेते. वडील वेदप्रकाश गोयल यांच्याकडे तिजोरीच्या चाव्या असलेले भाजपचे खजिनदारपद होते. वाजपेयी सरकारमध्ये वेदप्रकाश यांनी मंत्रिपद भूषविले. आई चंद्रकांता गोयल या मुंबईतील माटुंगा मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. खजिनदारपदाचा घराण्याचा वारसा त्यांनी पुढे चालू ठेवला आणि भाजपमध्ये वडिलांनी भूषविलेले खजिनदारपद त्यांच्याकडे चालून आले.

२०१०, २०१६ आणि २०२२ अशी तीन वेळा त्यांना भाजपने राज्यसभेवर संधी दिली. वास्तविक त्यांची राज्यसभेची मुदत २०२८ पर्यंत आहे. पण वर्षांनुवर्षे मागील दाराने म्हणजे राज्यसभेत निवडून येणाऱ्या नेत्यांना भाजपने लोकसभेच्या रिंगणात उतरविले आहे. वर्षांनुवर्षे राज्यसभेचे सदस्यत्व भूषविणाऱ्या सदस्यांचा लोकांशी थेट संपर्क येत नाही. यामुळेच अशा नेत्यांना लोकसभा लढणे हे मोठे आव्हान असते. लोकसभा निवडणूक लढावी लागेल हे पक्षाने सूचना केल्यावर पीयूष गोयल यांनी मतदारसंघांची शोधाशोध केली. त्यांचे मूळ वास्तव्य दक्षिण मुंबईत. हा मतदारसंघ बहुधा भाजपच्या वाटयाला येईल. पण दक्षिण मुंबई मतदारसंघ तेवढा सोपा नाही. यातूनच गोयल यांनी बोरिवली, दहिसर, मागठाणे, मालाड अशा पसरलेल्या उत्तर मुंबई मतदारसंघाला पसंती दिली. या मतदारसंघाचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी नाकारली जाणार हे निश्चित होते. मग गोयल यांनी तेथे लक्ष केंद्रित केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha elections 2024 piyush goyal to contest lok sabha elections for first time zws