मुंबई : विरोधकांनी खोटा प्रचार करून लोकसभा निवडणुकीत लोकांना फसवून मते मिळविली. त्यावेळी आम्हीही कुठेतरी कमी पडलो. आता विरोधकांच्या खोट्या प्रचारतंत्राला सरकारात्मक कामाच्या माध्यमातून सडेतोड उत्तर देणार असून विधानसभा निवडणुकीनंतरही विरोधक म्हणूनच काम करण्याची विरोधकांनी तयारी ठेवावी असा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिला. जनतेचा विचार, विकास आणि विश्वास हीच महायुतीच्या वाटचालीची त्रिसूत्री आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना शिंदे यांनी खोटा प्रचार करून राज्याची बदनामी करण्यावरून विरोधकांवर विशेषत: शिवसेना ठाकरे गटावर जोरदार टीका केली. गेल्या दोन वर्षात राज्याने आर्थिक, औद्याोगिक, शैक्षणिक क्षेत्रात घोडदौड केली आहे.

समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचावा, अशी सरकारची धडपड होती आणि त्यात सरकारला यश मिळाल्याचा दावा करून शिंदे म्हणाले, सरकारने गेल्या दोन वर्षात सुमारे ५५० हून अधिक जनहिताचे निर्णय घेतले. आम्ही घरात बसून नाही तर जनतेच्या दारात जाऊन शासन आपल्या दारी उपक्रम राबविला.

अर्थसंकल्पाच्या माध्यमातून माता भगिनींचे आयुष्य बदलवून टाकणाऱ्या योजना आणल्या. शेतकऱ्यांसाठी, युवकांसाठी, ज्येष्ठांसाठी योजना आणल्याचे त्यांनी सांगितले.

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून विविध योजना, पिक विमा यात गेल्या दोन वर्षात १ कोटी ७७ लाख ८८ हजार शेतकऱ्यांना ११ हजार ३९२ कोटींचा लाभ दिला गेल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच गेल्या महाविकास आघाडी सरकारच्या तुलनेत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत ९५ टक्क्यांनी वाढ झाली आणि शेतकऱ्यांना दिलेल्या लाभ किंवा अनुदानात सुमारे ६१ टक्के वाढ झाल्याचा दावाही त्यांनी केला.

वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ

राज्यातील असंघटीत वृत्तपत्र विक्रेत्यासाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. राज्यात वृतपत्र विक्रेत्यांची संख्या मोठी असून त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना या मंडळाच्या माध्यमातून राबविल्या जातील असे शिंदे यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांना टोला

लाडकी बहीण योजनेवर टीका करणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडताना ज्यांना सख्खे भाऊ समजले नाहीत, त्यांना लाडकी बहीण योजना कशी कळणार. या योजनेला राज्यभर महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. काहींचा माझा लेक लाडका आणि माझं कुटुंब, माझी जबाबदारी एवढाच अजेंडा असला तरी आम्ही राज्याची चिंता करतो असा टोलाही त्यांनी लगावला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha elections chief minister eknath shinde development assembly amy