मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजप- शिवसेना युतीचा झेंडा फडकाविणार, असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केला. तर भाजप आणि शिवसेना युती २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत राज्यात ४५ आणि विधानसभा निवडणुकीत २००हून अधिक जागा मिळवेल, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस, मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपचे , पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पदाची सूत्रे स्वीकारली. या वेळी भाजप प्रदेश कार्यालयापुढे कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
बावनकुळे यांचे विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आले. बावनकुळे व शेलार यांनी चैत्यभूमी, सावरकर स्मारक, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीस्थळ या ठिकाणी जाऊन आदरांजली वाहिली आणि प्रदेश कार्यालयात जाऊन पदग्रहण केले. या वेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना फडणवीस म्हणाले, मुंबई महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत भाजपला ८२ जागा मिळाल्या होत्या. त्या वेळीही भाजपचा महापौर आणणे शक्य होते, पण शिवसेनेला महापौरपद देण्याचा निर्णय झाल्याने आम्ही माघार घेतली. पण आता ती कसर भरून काढण्यासाठी शेलार यांच्याकडे पुन्हा मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आता शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेबरोबर मुंबई महापालिका आणि २०२४ मध्ये राज्यातही युतीची सत्ता आणल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही.
आगामी महापालिका आणि २०२४ मधील विधानसभा- लोकसभा निवडणुकीत भाजप मुंबईसह राज्यात पहिल्या क्रमांकाचे यश संपादन मिळवेल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. प्रत्येक निवडणूक केंद्रावर ५० तरुण कार्यकर्ते (युवा वॉरियर्स) नियुक्त करण्याचे उद्दिष्ट असून असे २५ लाख कार्यकर्ते पुढील काळात नेमण्याचे काम केले जाईल, असे त्यांनी सांगितले.