मुंबई : संसद वा विधानसभेत कागद फाडणे, आरडाओरडा करणे, घोषणाबाजी करणे, कामकाज रोखणे, हाणामाऱ्या करणे ही देशासाठी ही अत्यंत चिंतेची बाब आहे, अशी खंत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शुक्रवारी व्यक्त केली.
आपण जनतेच्या हक्कासाठी लढतो, कल्याणासाठी झटतो, समाजात सकारात्मक बदल घडावेत यासाठी निवडून येतो, त्या ठिकाणी आपण अशी वर्तणूक करणे नैतिकतेला धरून नाही. त्यामुळे भावी पिढीसमोर लोकप्रतिनिधी म्हणून आपण काय आदर्श ठेवतो, याचे भान राखणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, अशी समज ओम बिर्ला यांनी लोकप्रतिनिधींना दिली. पुणे येथील ‘एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे आयोजित केलेल्या राष्ट्रीय आमदार संमेलनाच्या उद्घाटन सोहळय़ात ते बोलत होते. शुक्रवारी या संमेलनात एकूण ३१ राज्यांतील १,४७५ आमदार उपस्थित होते. यामध्ये १५८ महिला आमदारांचा समावेश होता. भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे अधोरेखित करणाऱ्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम या प्रदर्शन पॅव्हिलियनचे ओम बिर्ला यांच्या हस्ते या वेळी उद्घाटन करण्यात आले.
देशाच्या लोकशाहीला बळकटी देण्याकरिता, तसेच प्रभावशाली प्रशासन, शांतताप्रिय समाज घडविण्याच्या उद्देशाने प्रथमच दोन हजारांपेक्षा अधिक आमदारांना एकाच व्यासपीठावर आणून विचारमंथन घडविण्याचा प्रयत्न या परिषदेतर्फे केला जाणार आहे. निवडणुकांमध्ये आपण आमदार किंवा खासदार म्हणून निवडून येतो. आपण राजकीय पक्षाचे नव्हे, तर जनतेचे प्रतिनिधी असतो. त्यामुळे विविध पक्षांच्या विचारधारेमध्ये जरी मतभेद असले, तरी कायदा, विविध मुद्दे, नीती, कार्यक्रम यांवर चर्चा होणे गरजेचे आहे, असेही बिर्ला म्हणाले.
संमेलनात माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, मीरा कुमार, शिवराज पाटील, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आदी मान्यवर उपस्थित होते.
‘जनतेने आपल्याला चांगले कायदे बनवण्यासाठी, देशाचा विकास साधण्यासाठी निवडून दिले आहे. त्यामुळे अधिक काळ आपल्याला कसे काम करता येईल यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे,’ असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित आमदारांना दिला.
‘रॅम्प ऑफ डेमोक्रसी’
कार्यक्रमात ‘रॅम्प ऑफ डेमोक्रसी’ या विशेष सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले होते. यात सहभागी आमदारांनी आपल्या राज्यातील पारंपरिक पोशाखात आपल्या संस्कृतीचे दर्शन घडविले. पार्श्वगायिका उषा उथुप यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. संमेलनाच्या पहिल्या दिवशी भारतातील विविध राज्यांतील संस्कृतीचे दर्शन घडविणारा ‘भारत महोत्सव’नामक नृत्याविष्कार सादर करण्यात आला होता. ‘एमआयटी’चे संस्थापक राहुल व्ही. कराड यांच्या संकल्पनेतून या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.