गेल्या वर्षी झालेल्या पहिल्यावहिल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ महोत्सवात सर्जनशीलतेने भरलेल्या तरुणाईच्या उत्साहाचा धबधबा बरसला होता. या उत्साही गुणवान कलावंतांना आयरिस प्रॉडक्शनच्या पाठिंब्यामुळे मालिकांचा पुढचा मार्गही खुला झाला आहे. ‘सॉफ्टकॉर्नर’ प्रस्तुत ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या पहिल्या पर्वात १०० एकांकिकांच्या चाळणीतून बाहेर पडलेल्या काही गुणवंतांना मालिकाविश्वात प्रवेश मिळाला आहे.
‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या पहिल्या पर्वात ठाण्याच्या जोशी-बेडेकर महाविद्यालयाने ‘मोझलेम’ ही एकांकिका सादर केली होती. या एकांकिकेत दमदार काम केलेल्या पवन ठाकरे या तरुणाला ‘आयरिस प्रॉडक्शन’ने हेरले. स्पर्धेनंतर पवनला ‘आयरिस’कडून पहिली संधी मिळाली ती त्यांच्या ‘देवयानी’ या मालिकेत काम करण्याची.. या मालिकेत समर नावाच्या महाविद्यालयीन तरुणाची भूमिका साकारणाऱ्या पवनचा ‘लोकांकिका’ ते मालिका हा प्रवास कसा होता हे त्याच्याच शब्दात..
‘लोकसत्ता लोकांकिका’ ही गेल्या वर्षीची सर्वात मोठी एकांकिका स्पर्धा ठरली आहे. आजघडीला अनेक नावाजलेल्या एकांकिका स्पर्धा आपल्याकडे भरवल्या जातात. मात्र, या स्पर्धामध्ये सहभागी होणाऱ्यांमध्ये गेली अनेक वर्षे एकांकिकांमधून काम करणाऱ्या प्रस्थापित कलाकारांची यादी मोठी आहे. माझ्यासारख्या नवख्या तरुणाला अशा स्पर्धामध्ये क्वचितच स्थान मिळते. मात्र, ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेमुळे आमची नाटय़कला सिद्ध करण्याची संधी मिळाली. मात्र, एका एकांकिकेच्या बळावर जेव्हा मला ‘आयरिस प्रॉडक्शन’कडून मालिकेत काम करण्याबद्दल विचारणा झाली तेव्हा त्यावर खरंच विश्वास बसत नव्हता. आतापर्यंत केवळ एक एकांकिका सादर केलेला मी थेट मालिकेत काम करू शकलो, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. ‘आयरिस’ने मला चांगली भूमिका दिली. यामुळे मला पुढचे मार्ग नक्की मिळू शकतील. अभिनयक्षेत्रात नाव कमावण्याचे स्वप्न बाळगणाऱ्यांसाठी एकांकिकेतून थेट मालिकेत काम करण्याची संधी देणारा ‘लोकसत्ता लोकांकिका’ हा मोठा सुंदर मार्ग आहे. – पवन ठाकरे