मुंबई : एसटीतील ई तिकीट प्रणाली व यंत्र खरेदी निविदांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणारी भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी सादर केलेली याचिका लोकायुक्त विद्यासागर कानडे यांनी नुकतीच फेटाळून लावली. परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर कोटेचा यांनी भ्रष्टाचाराचे आरोप या याचिकेत केले होते. लोकायुक्तांच्या निर्णयाविरुद्ध एक-दोन दिवसांत उच्च न्यायालयात याचिका सादर करणार असल्याचे कोटेचा यांनी सांगितले. या ई तिकीट यंत्रणा खरेदीसाठी सर्वात कमी रकमेची निविदा मंजूर करण्याची शिफारस एसटी संचालक मंडळाने अध्यक्षांना केली होती. त्यावर काही महिने निर्णय घेण्यात आला नाही. त्यानंतर परब यांनी निविदेत तांत्रिक बदल करून ती प्रसिद्ध करण्यास सांगितले. त्या वेळी नव्याने निविदा मागविण्यास संचालक मंडळाची पुन्हा परवानगी घ्यावी, असे प्रशासनाचे म्हणणे होते. ही बाब नमूद करून कोटेचा यांनी करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. मात्र निविदा उघडल्याच गेल्या नसल्याने भ्रष्टाचार झालाच नाही, असा निष्कर्ष काढून लोकायुक्तांनी याचिका फेटाळून लावली.
तर आधीच्या निविदेत तांत्रिक अटींमध्ये बदल करुन नव्याने निविदा मागविणे, अधिकार नसताना हा निर्णय घेणे, यातून भ्रष्टाचार सिध्द होत असल्याचा अर्जदारांचा दावा लोकायुक्तांनी फेटाळला.