मुंबई : समाजातील घडामोडींवर भाष्य करण्याची आपली परंपरा यंदाही ‘लोकप्रभा’च्या दिवाळी अंकाने कायम राखली असून यंदाही वाचनीय अशा लेखांनी हा अंक सजला आहे. लडाखच्या हक्कांसाठीच्या सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या लढ्याचा पश्मीना शालींशी काय संबंध आहे, चीनचा विस्तारवाद आणि भारत सरकारचा विकासवाद यामुळे पश्मीनाच्या साखळीतील पहिली कडी असणाऱ्या चांगपा जमातीपुढे कोणती आव्हाने उभी राहिली आहेत, याचे विवरण विजया जांगळे यांच्या ‘विरलेले धागे…पश्मीनाचे’ या लेखात वाचायला मिळते. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मर यांच्यासाठी अवकाशात अडकल्यानंतर तगून राहणे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या किती खडतर आहे, याची माहिती अमोल परांजपे यांनी ‘दोन शास्त्रज्ञ त्रिशंकू होतात तेव्हा…’ या लेखात दिली आहे. यंदा प्रथमच संसदेत निवडून गेलेल्या चंद्रशेखर आझाद यांचा संघर्षमय प्रवास महेश सरलष्कर यांनी ‘मैं आज़ाद हूँ!’ या लेखात कथन केला आहे. बलुचिस्तानच्या लढ्याचा चेहरा ठरलेल्या माहरंग बलोच यांचे व्यक्तिमत्त्व ‘लढवय्यी माहरंग!’ या लेखात वैशाली चिटणीस यांनी चित्रित केले आहे. जंगलात लपून गुप्तपणे रेडिओ वाहिनी चालवून गोवा मुक्तिसंग्रामात मोलाचे योगदान देणाऱ्या लिबिया लोबो यांचा संघर्ष किशोर अर्जुन यांनी ‘गोंयचे सोडवणेचों आवाज’ या लेखात वर्णिला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा