मुंबई : भक्ती आणि उत्साहाने भारलेला नवरात्रीचा आनंद सोहळा अधिक रंगतदार करणाऱ्या ‘लोकसत्ता ९९९ – नवभक्ती, नवरंग, नवरात्री’ या उपक्रमाचे यंदाही आयोजन करण्यात आले आहे. येत्या सोमवारी घटस्थापनेपासून त्याला दणक्यात सुरुवात होणार आहे.
पारंपरिक मंगळागौरीचे खेळ, पाककलेपासून नानाविध कलागुणांची परीक्षा पाहणाऱ्या विविध स्पर्धा आणि खेळ यांच्याबरोबरच बक्षिसांची खैरात घेऊन येणारा ‘रामबंधू मसाले’ प्रस्तुत ‘लोकसत्ता ९९९ – नवभक्ती, नवरंग, नवरात्री’ हा स्पर्धा उपक्रम सोमवार, २६ सप्टेंबर ते मंगळवार, ४ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे.
नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे भक्तीचा आणि आनंदाचा सोहळा. दिवसभर कामाच्या धबडग्यातही गृहिणी वेळात वेळ काढून देवीची पूजा, उपास नेटाने करतात. तोच उत्साह नवरात्रीच्या जागरात गरबा आणि दांडियासाठी फेर धरतानाही कायम असतो. हाच उत्साह आणि आनंद अनुभवण्याची संधी ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमातूनही मिळणार आहे.
‘लोकसत्ता ९९९ – नवभक्ती, नवरंग, नवरात्री’ या स्पर्धेच्या माध्यमातून मुंबई आणि उपनगरांतील नऊ वेगवेगळय़ा नवरात्रोत्सव मंडळांबरोबर ‘लोकसत्ता’ही सहभागी होणार आहे. स्पर्धेच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’चा चमू लालबाग, भायखळा, गोरेगाव, बोरिवली – कांदिवली, वाशी, घाटकोपर, ठाणे आणि डोंबिवली अशा एकूण नऊ नवरात्रोत्सव मंडळांना भेट देणार आहे. स्पर्धेत जे समूह अतिशय उत्तम पद्धतीने मंगळागौरीचे आणि पारंपरिक खेळ सादर करतील, स्पर्धेत उत्तम कामगिरी करतील, त्या समूहाला स्पर्धेच्याच ठिकाणी आकर्षक पारितोषिके देऊन गौरवण्यात येणार आहे.