लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई: दोन वर्षांच्या नीचांकी पातळीवर घरंगळलेला विकासदर आणि महागाईबाबत सतत सुरू राहिलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर यंदाचा अर्थसंकल्प सादर केला जाईल. चिवटपणे पाठलाग करीत असलेल्या किंमतवाढीपासून सर्वसामान्यांची सुटका करण्यासाठी अर्थमंत्र्यांनी कोणते उपाय योजले याचा आढावा शनिवारी, १ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता मुलुंडमध्ये होत असलेल्या ‘लोकसत्ता विश्लेषण’ कार्यक्रमातून घेतला जाणार आहे.

सरकारने आर्थिक शिस्तीचा आदर्श घालून देऊन, अर्थगती आणि चलनवाढ यांत संतुलनाकडे गांभीर्याने लक्ष देणे हे अत्यावश्यक बनले आहे. अर्थसंकल्पातून या अपेक्षांना खरेच धोरणात्मक मूर्तरूप दिले गेले काय, याबाबत या कार्यक्रमांत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर हे मांडणी करतील. मध्यमवर्गीय नोकरदारच नव्हे तर ग्राहक, व्यावसायिक आणि गुंतवणूकदार अशा सर्वांच्याच औत्सुक्याच्या असलेल्या प्राप्तिकराच्या तरतुदी आणि आणि त्यांच्या सर्वसामान्यांच्या जीवनावरील परिणामांबाबत ज्येष्ठ सनदी लेखापाल दीपक टिकेकर हे समालोचन करतील.

हा कार्यक्रम महाराष्ट्र सेवा संघ सभागृह, पं. जवाहरलाल नेहरू मार्ग, अपना बाजारच्या वर, मुलुंड (प.) येथे १ फेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. सुमित ग्रुप हे ‘लोकसत्ता विश्लेषण’चे मुख्य प्रायोजक असून, ठाणे भारत सहकारी बॅंक लिमिटेड ही या कार्यक्रमाची सहप्रायोजक आहे. कार्यक्रमासाठी सर्वांना प्रवेश खुला आणि विनामूल्य आहे.

देशाच्या आर्थिक नियोजनाचा लेखाजोखा असणाऱ्या या महत्त्वाच्या धोरण दस्तऐवजाचा सर्वसामान्यांनी नेमका अर्थ कसा लावावा आणि अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणांचे गमक काय, याचा उलगडा करणारा हा विश्लेषणात्मक कार्यक्रम सर्वांसाठी उद्बोधक ठरेल.

अर्थसंकल्पानंतरचे विश्लेषण सहभाग:

दीपक टिकेकर, ज्येष्ठ सनदी लेखापाल, कर सल्लागार

गिरीश कुबेर, संपादक, लोकसत्ता

●कधी : शनिवार, १ फेब्रुवारी २०२५

●वेळ : सायं. ६ वाजता

●कुठे: महाराष्ट्र सेवा संघ सभागृह, पं. जवाहरलाल नेहरू मार्ग, अपना बाजारच्या वर, मुलुंड (प.)

प्रायोजक● मुख्य प्रायोजक : सुमित ग्रुप● सह प्रायोजक : ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेड

(प्रथम येणाऱ्यास प्राधान्य, काही जागा राखीव)