बोरिवलीत उद्या ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ कार्यक्रम; तज्ज्ञांकडून मार्गदर्शन
नोटाबंदीनंतरच्या अर्थव्यवस्थेला वस्तू व सेवा कराच्या रूपाने नवी शिस्त लागणार असतानाच गुंतवणूक व बचतीचा आगामी पथ कसा असेल हे ‘लोकसत्ता अर्थसल्ला’च्या व्यासपीठावर येत्या रविवारी उलगडणार आहे. गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे असलेले अर्थनियोजन तसेच शेअर बाजारातील व्यवहार यावर विशेष मार्गदर्शन तज्ज्ञ वक्ते करतील.
‘रिलायन्स म्युच्युअल फंड’ प्रस्तुत ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ हे गुंतवणूकदार मार्गदर्शनपर सत्र येत्या रविवारी, २५ जून २०१७ रोजी सकाळी १०.३० वाजता सेंट अॅन्स हायस्कूल, लोकमान्य टिळक रोड, सावरकर उद्यानाजवळ बोरिवली (पश्चिम) येथे पार पडणार आहे.
‘लोकसत्ता अर्थ वृत्तान्त’चे स्तंभलेखक अजय वाळिंबे आणि वसंत माधव कुलकर्णी यांच्याकडून यावेळी गुंतवणूकदारांच्या शंकांचे निरसनही केले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रवेश सर्वासाठी खुला आणि विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल.
भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक त्यांच्या ऐतिहासिक उच्चांकानजीक असणे, पारंपरिक बचत ठेवींवरील व्याज कमी होणे, विमा – म्युच्युअल फंडातील वेगवान घडामोडी, सोने – स्थावर मालमत्ता गुंतवणुकीतील परताव्याची हमी कमी होणे या पाश्र्वभूमिवर गुंतवणुकीची आगामी दिशा कशी असावी याबाबतचे मार्गदर्शन या उपक्रमातून होणार आहे.