घाटकोपरमध्ये रविवारी ‘लोकसत्ता अर्थभान’ उपक्रमात मार्गदर्शन
मुंबई : भांडवली बाजारातील सलग तेजी, घसरते खनिज तेल दर, सावरता रुपया, कमी होत जाणारी वित्तीय तूट असे सारे अर्थव्यवस्थेसाठी पूरक वातावरण असताना आपल्या व्यक्तिगत गुंतवणुकीबाबत नेमके काय धोरण असावे? शेअर अथवा म्युच्युअल फंडसारखा पर्याय तसेच स्थिर परतावा देणाऱ्या विविध योजनांबद्दल आगामी नियोजन दिशा काय असावी अशा गुंतवणूकदारांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी ‘लोकसत्ता अर्थभान’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड’ प्रस्तुत हा कार्यक्रम रविवारी घाटकोपरमध्ये होणार असून त्यात अर्थसाक्षरतेवर मार्गदर्शन करण्यात येईल. श्रीमती पी. एन. दोशी वुमन्स कॉलेज ऑडिटोरियम (एसएनडीटी), कामा गल्ली, घाटकोपर (पश्चिम) हा कार्यक्रम होईल. यावेळी गुंतवणूकदारांना त्यांच्या शंका विचारता येतील आणि उपस्थित तज्ज्ञ अर्थनियोजनकार त्यांना मार्गदर्शन करतील. कार्यक्रमासाठी विनामूल्य प्रवेश असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल. निमंत्रितांसाठी काही जागा राखीव आहेत. याच उपक्रमातील यापूर्वीचा कार्यक्रम नुकताच जोगेश्वरी येथे झाला. येत्या काही दिवसांत असेच मार्गदर्शनपर कार्यक्रम अन्यही काही उपनगरांमध्ये आयोजित करण्यात येणार आहेत.
घाटकोपर येथील कार्यक्रमात ‘अर्थनियोजनाचा श्रीगणेशा’ या विषयाद्वारे सनदी लेखापाल तृप्ती राणे या गुंतवणुकीचे पारंपरिक पर्याय, त्यातून मिळणारा परतावा आणि मिळकतीवरील करमात्रा याविषयी विवेचन करतील. विविध वयोगटांतील व्यक्तींचे आर्थिक नियोजन, गुंतवणूक प्रमाण यावरही त्या मार्गदर्शन करतील.
‘इक्विटी आणि म्युच्युअल फंड गुंतवणूक’ यावर आर्थिक सल्लागार सुयोग काळे भांडवली बाजार आणि म्युच्युअल फंड यांचा संबंध विशद करतील. दोन्ही गुंतवणूक माध्यमांची वैशिष्टय़े विषद करतील. या गुंतवणूक पर्यायांतील काही उदाहरणे मांडून त्यावरील परतावा, दीर्घकालीन उद्दिष्टे आदींवर प्रकाश टाकण्यात येईल.
वक्ते
तृप्ती राणे : अर्थनियोजनाचा श्रीगणेशा
सुयोग काळे : इक्विटी आणि म्युच्युअल फंड गुंतवणूक
कधी? रविवार २३ डिसेंबर २०१८, सकाळी १०.३० वाजता
कुठे? श्रीमती पी. एन. दोशी वुमन्स कॉलेज ऑडिटोरियम (एसएनडीटी), कामा गल्ली, घाटकोपर (पश्चिम)