लोकसत्ता बदलता महाराष्ट्र चर्चासोहळ्यातील ‘ती आणि धर्म’ या सत्रात मान्यवरांचा सूर
रूढी व स्त्रियांना दुय्यमपणा देण्यासाठी त्याचा लावलेला सोयीस्कर अर्थ यामुळे स्त्रियांना स्वावलंबनापासून दूर ढकलण्यात सर्वच धर्म एका पातळीवर येतात, त्यामुळे या कालबाहय़ रूढी झुगारून देण्यातच शहाणपण आहे, अशा भावना ‘ती आणि धर्म’ या सत्रात व्यक्त झाल्या. लेखिका मंगला सामंत, सामाजिक कार्यकर्त्यां ऊर्मिला पवार आणि प्रा. मोहसिना मुकादम यांनी विविध उदाहरणांद्वारे धर्मावरील पुरुषप्रधानत्व दाखवून दिले. मासिक पाळी सुरू असताना देवाजवळ जाऊ नये हा केवळ स्त्रीला दुय्यम लेखण्याचे एक साधन आहे, धर्मात त्याला आधार नाही. जागतिक महिला दिनी महिलांचे सत्कार करण्यापेक्षा लिंगभेदावर आधारित मंदिर प्रवेशपद्धतीवर मुख्यमंत्र्यांनी बंदी आणायला हवी होती, असा टोलाही या सत्रात लगावण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोकणी मुसलमान हा पुरोगामी मानला जातो. मात्र १९९३ नंतर त्यांच्यावर सौदी अरेबियातील मुस्लीम धर्माची वेगळी ओळख लादण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला आहे. खरे तर देशातील मुस्लिमांनी बाहेरील समाजाचे अनुकरण करणे चुकीचे आहे. महम्मद पैगंबराने मुस्लिमांमध्ये लग्न मोडण्याचा अधिकार स्त्रियांनाही दिला आहे. धर्मग्रंथातील उल्लेखांचा सोयीनुसार अर्थ लावला जाऊन महिलांवर बंधने लादली गेली. स्वातंत्र्य आणि समान अधिकार मिळविण्याबाबत स्त्रियांशी दुजाभाव करणारे सर्व रीतिरिवाज सोडून द्यावे लागतील.
– प्रा. मोहसिना मुकादम

डॉ. आंबेडकर यांनी हिंदू कोड बिलात स्त्रियांच्या हक्काची दहा कलमे नमूद केली. मात्र त्यातील स्वहित न दिसल्याने हिंदू स्त्रियांनीच त्याला विरोध केला. खरे तर ज्याला आपण धर्म म्हणतो त्यात स्त्रियांना कोणतेही स्थान नाही. द्रौपदीच्या रक्षणासाठी आलेल्या श्रीकृष्णाचे गोडवे गायले जातात, पण वस्त्राचा पुरवठा करण्याऐवजी स्त्रीला अपमानित करू पाहणाऱ्या दु:शासनाचे हात त्याने का तोडले नाहीत, असा प्रश्न कुणाला पडतच नाही. माणूस म्हणून जगायचे असेल तर स्त्रियांनी बंधने झुगारून देणे आवश्यक आहे.
– ऊर्मिला पवार

बाळंतपणामुळे २० ते २५ हजार वर्षांपूर्वी अग्नीच्या साथीने स्त्रिया सर्वप्रथम गुहेमध्ये स्थिरावल्या व मातृसत्ताक टोळ्यांचा उदय झाला. ‘जगा आणि जगवा’ हे त्यांचे धोरण होते. त्याउलट ‘मारा आणि भोगा’ हे धोरण असणाऱ्या पुरुष टोळ्यांनी स्त्रियांना भोगवस्तू ठरवून त्यांचे सर्व अधिकार काढून घेतले. मातृसत्ताक संस्कृतीच्या वाहक स्त्रिया आणि चालक क्षुद्र होते. त्यामुळेच पुढील काळात त्यांच्यावर र्निबधे लादली गेली. हजारो वर्षांच्या या अन्यायकारक संस्कारांचा प्रभाव शंभरेक वर्षांत नाहीसा होणे अशक्य आहे. मात्र मातृसंस्कृतीच्या या इतिहासाचा शिक्षणात अंतर्भाव केला तर अंधश्रद्धा दूर होण्यास मदत होईल.
– मंगला सामंत

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta badalta maharashtra