उद्योगासाठीचे नेतृत्व आणि आर्थिक पाठबळ या प्रमुख आव्हानांवरील चर्चात्मक ऊहापोह ‘लोकसत्ता’ आणि ‘सारस्वत बँक’ यांच्याद्वारे आयोजित ‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमात दुसऱ्या दिवशी होणार आहे. अपोलो बंदरनजीकच्या हॉटेल ताज महाल पॅलेसमध्ये दोन दिवस होणाऱ्या चर्चासत्राच्या समारोपदिनी उद्यमभार समर्थपणे पेलणाऱ्या स्त्री उद्योजिका आणि उद्योगधंद्यांसाठी वित्त पुरवठय़ाचा प्रश्न यावर प्रकाश टाकला जाईल.
मंगळवार, २४ जून रोजी सायंकाळी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमाच्या यंदाच्या पर्वाचा समारोप होणार आहे. या निमित्ताने राज्यातून उद्योगांचे होत असलेले स्थलांतर हे किती खरे, किती खोटे आणि स्थलांतर होत असल्यास त्याच्या कारणमीमांसेवर प्रसिद्ध उद्योगपतींकडून ऊहापोह होईल. या चर्चेत प्रसिद्ध उद्योगपती व कायनेटिक समूहाचे अध्यक्ष अरुण फिरोदिया, बजाज इलेक्ट्रिक्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर बजाज यांचा सहभाग असेल.
तत्पूर्वी मंगळवारी सकाळी ‘आम्ही उद्योजिका’ या विषयावरील सत्राने चर्चेला प्रारंभ होईल. यात एक महिला म्हणून उद्योग फुलविताना येणारे अनुभव, उभी ठाकणारी आव्हाने व त्यावर नियंत्रण आदींचे कथन खुद्द यशस्वी महिला उद्योजिका करतील. ‘महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळा’च्या उपाध्यक्षा मीनल मोहाडीकर, इंडोको रेमिडिज्च्या व्यवस्थापकीय संचालिका अदिती कारे-पाणंदीकर आणि ‘कमानी टय़ूब्स’च्या अध्यक्षा कल्पना सरोज या सत्राच्या मानकरी असतील.
दुपारच्या सत्रात ‘उद्योग व वित्त पुरवठा’ अशा या क्षेत्रातील कळीच्या मुद्दय़ावर चर्चा होईल. उद्योगाशी संबंधित वित्त पुरवठय़ाची प्रक्रिया व विद्यमान स्थिती यावर या वेळी ‘दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री’चे अध्यक्ष मिलिंद कांबळे, श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्सचे उपाध्यक्ष पी. पी. पुणतांबेकर व एल अ‍ॅण्ड टी फायनान्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीनानाथ दुभाषी हे आपली मते मांडतील.
बदलता महाराष्ट्र :
उद्योगाचे आव्हान
*कधी : २३ व २४ जून २०१४, सकाळी १० ते सायंकाळी ४
*कुठे : हॉटेल ताजमहल पॅलेस, अपोलो बंदर
(प्रवेश फक्त निमंत्रितांसाठीच)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा