मुंबई : ‘जिल्हा निर्देशांका’सारख्या शास्त्रीय मूल्यमापनामुळे चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळते, असे प्रशंसोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी काढले. राज्यात केवळ विकासाची बेटे तयार न करता समतोल विकास साधण्याचा आपला प्रयत्न असल्याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली. ‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांका’चे प्रकाशन आणि पुरस्कार सोहळ्यामध्ये ते बोलत होते.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षण, आरोग्य, उद्याोग अशा विविध क्षेत्रातील कामगिरीचे शास्त्रीय पद्धतीने मूल्यमापन करून चांगली कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना ‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’ कार्यक्रमात गौरविण्यात आले. या उपक्रमाचे कौतुक करत पुढील वर्षी ‘सीएम डॅशबोर्ड’ हा उपक्रम ‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांका’बरोबर भागीदारी करील, असे फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले. या अतिशय दिमाखदार सोहळ्यात पंतप्रधानांच्या आर्थिक परिषदेचे सदस्य संजीव सन्याल यांनी ‘विकसित भारताची वाटचाल’ या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास (पान १० वर) (पान १ वरून) सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार, कौशल्यविकासमंत्री मंगलप्रभात लोढा, वनमंत्री गणेश नाईक उपस्थित होते.

जिल्हा निर्देशांकासारख्या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करताना फडणवीस म्हणाले, की शासनामध्ये चांगले किंवा वाईट काम करणाऱ्यांना एकाच पारड्यात तोलले जाते. चांगले काम करणाऱ्याला शाबासकी दिली जात नाही आणि वाईट काम करणाऱ्यांना शिक्षाही होत नाही. पण ‘लोकसत्ता’सारख्या त्रयस्थ संस्थेकडून शासकीय यंत्रणेकडून केलेल्या कामासाठी जिल्ह्याला गौरविण्यात येत असल्याने आपल्यालाही हा सन्मान मिळावा, अशी स्पर्धेची भावना जिल्ह्यांमध्ये रुजत आहे. ही चांगली बाब आहे. त्यामुळे शासनाच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमात राज्यभरातील दहा हजार कार्यालये कशाप्रकारे काम करीत आहेत, याचे मूल्यमापन ‘क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया’सारख्या त्रयस्थ संस्थेकडून करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्याच्या समतोल विकासाचे प्रयत्न

राज्यात मुंबई, ठाणे, पुणे व छत्रपती संभाजीनगर अशी विकासाची काही बेटे तयार न करता समतोल विकासाचे ध्येय साध्य करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने सरकारची वाटचाल सुरू आहे. देशातील सर्वात मोठे पोलाद क्षेत्र (स्टील हब) गडचिरोलीत उभारण्यात येत असून नागपूर, धुळे, वाशिम, पालघर आदी भागांमध्ये उद्याोग उभारले जात आहेत. समृद्धी महामार्गाने मागास विभाग मुंबई-नागपूरशी जोडले गेले असून शक्तिपीठ महामार्गाचीही उभारणी करण्यात येणार आहे. वाढवणसारख्या देशातील सर्वात मोठ्या बंदरामुळे पालघरमध्ये आता चौथी मुंबई आकारास येणार आहे. त्याच परिसरात आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे स्थानक उभारण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी केले. विजय कदम यांनी सूत्रसंचालन केले.

● पुढल्या वर्षीपासून ‘सीएम डॅशबोर्ड’ निर्देशांकाचे भागीदार

● चांगल्या कामाला शाबासकीची थाप महत्त्वाची

● निर्देशांकामुळे तालुका, गाव पातळीवर केलेल्या कामाचा गोषवारा

‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’ सोहळ्यात विजेते जिल्हाधिकारी व जिल्हा प्रतिनिधी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे गौतम ठाकूर, पंतप्रधानांच्या आर्थिक परिषदेचे सदस्य संजीव सन्याल, महानिर्मितीचे राधाकृष्णन बी., महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे राजेशकुमार जयस्वाल, तसेच गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सचे डॉ. सविता कुलकर्णी आणि डॉ. शिवा रेड्डी आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार, सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा, पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक, ‘इंडियन एक्स्प्रेस समूहा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉर्ज वर्गीस. (छाया : दीपक जोशी)

मुख्य प्रायोजक

सारस्वत कोऑप. बँक लिमिटेड

पॉवर्ड बाय

महानिर्मिती, महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड

नॉलेज पार्टनर

गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अॅण्ड इकॉनॉमिक्स, पुणे