मुंबई : जिल्ह्यांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, औद्याोगिक, आरोग्यविषयक प्रगतीची सांगड घालून विकासाची शास्त्रीय मांडणी असलेला ‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’ अहवालाला तज्ज्ञांच्या समितीने अंतिम स्वरूप दिले आहे. येत्या बुधवारी, १२ मार्च रोजी मुंबईत होणाऱ्या सोहळ्यात या अहवालाचे प्रकाशन करण्यात येणार असून निर्देशांकात लक्षवेधी कामगिरी नोंदवणाऱ्या जिल्ह्यांना गौरवण्यात येणार आहे.
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य अर्थतज्ज्ञ संजीव सन्याल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती असेल.
जिल्ह्यांच्या विकासाचे मोजमाप करण्यासाठी केवळ दृश्य आकडेवारीचा विचार न करता विविध १२ घटकांतील सांख्यिकीचे विश्लेषण करून ‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’ तयार करण्यात येतो.
या निर्देशांकानुसार ठळक कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांना गौरवण्यात येते. मात्र, जिल्ह्यांच्या कामगिरीची उतरंड मांडणे हा केवळ या निर्देशांकाचा उद्देश नसून त्यातून राज्य शासन किंवा जिल्हा प्रशासनांना भविष्यातील विकासाची रूपरेषा आखता यावी, असाही या अहवालाचा हेतू आहे. त्यामुळेच अतिशय क्लिष्ट सांख्यिकीच्या अभ्यासातून तयार करण्यात आलेल्या या अहवालाला तज्ज्ञांच्या समितीमार्फत अंतिम स्वरूप देण्यात येते.
तज्ज्ञांची समिती
यंदा या समितीत मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे, सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, ‘आयएसईजी’ फाउंडेशनचे संस्थापक भागीदार आणि संचालक डॉ. शिरीष संख्ये आणि केंद्रीय वित्त आयोगाचे माजी सदस्य तसेच ‘अर्थ ग्लोबल’चे कार्यकारी संचालक डॉ. निरंजन राजाध्यक्ष, महाराष्ट्राच्या आर्थिक व सांख्यिकी संचलनालयाचे संचालक कृष्णा फिरके, निर्देशांक अहवालाची मांडणी करणारे गोखले संस्थेचे सहयोगी प्राध्यापक डॉ. शिवा रेड्डी आणि सहाय्यक प्राध्यापिका डॉ. सविता कुलकर्णी यांचा समावेश आहे.
चांगली कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांचा सन्मान
मुंबईत गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत तज्ज्ञ समितीने या अहवालाला अंतिम स्वरूप दिले असून त्याआधारे तयार करण्यात आलेल्या अहवालाचे १२ मार्चला प्रकाशन होणार आहे. तसेच निर्देशांकानुसार चांगली कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांचा गौरवही करण्यात येईल.
मुख्य प्रायोजक
सारस्वत को-ऑप बँक लिमिटेड
पॉवर्ड बाय
महानिर्मिती, महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड
नॉलेज पार्टनर
गोखले इन्स्टिट्यूट, पुणे</p>