मुंबई : सकस, दर्जेदार आणि नावीन्यपूर्ण साहित्याची आरास ही ‘लोकसत्ता’ दिवाळी अंकाची खासियत. साहित्यिक फराळाच्या गर्दीत ही परंपरा यंदाच्या अंकानेही कायम राखली आहे. नामवंत लेखक, विचारवंत यांच्या कसदार लेखनाने यंदाचा ‘लोकसत्ता’ दिवाळी अंक सजला आहे. वैचारिक लेखमाला, कथा आणि इतिहास, साहित्य, कला-संस्कृती, चित्रपट या विषयांवर माहितीपूर्ण लेखांचा ऐवज अंकात आहे.
विजय पाडळकर यांनी विस्मृतीत गेलेल्या आणि चित्रपटाच्या इतिहासात अढळ स्थान मिळविलेल्या ‘ग्रीड’ या मूकपटाविषयीची रसाळ कथा वर्णिली आहे. फिनलंडमधील ‘आर्ट टाऊन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावातील कलाप्रदर्शनाचं अरुंधती देवस्थळे यांनी केलेले रसभरीत कलात्मक वर्णन वाचता येईल. लोकेश शेवडे यांनी जर्मनीच्या हिंसात्मक इतिहासाचा मागोवा घेत ‘इतिहास, वर्तमान, भविष्य’ अशी केलेली विचारात्मक मांडणी म्हणजे विचारी आणि सजग वाचकासाठी पर्वणीच.
हेही वाचा : दिवाळीनिमित्त अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई, ३ कोटी ११ लाखांचा माल जप्त
‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’च्या (आर.एस.एस) शताब्दीनिमित्ताने संघाच्या शतकभराच्या वाटचालीचा वेध घेणारा विशेष विभाग अंकात आहे. संघाच्या कार्याचा आढावा घेणारा सुधीर पाठक यांचा लेख या विभागाचे आकर्षण आहे. तर संघाच्या परिवर्तनकाळाचे साक्षीदार असलेले राजकीय विश्लेषक दिलीप देवधर यांनी संघाची लिखित माहिती उपलब्ध व्हावी यासाठी केलेले प्रयत्न, तसेच संघ गीतांचा श्रीपाद कोठे यांनी घेतलेला वेध, देवेंद्र गावंडे यांनी नक्षलवाद आणि संघ या दोन विचारधारांवर मांडलेला लेखाजोखा, राहुल भाटिया यांनी एका संघ सदस्याची मांडलेली व्यथा वाचायला मिळेल.
फणीश्वर रेणू या हिंदीतील अभिजात साहित्यिकाचा आसाराम लोमटे यांनी साकारलेला जीवनपट वाचनीय आहे. श्याम मनोहर आणि मिलिंद बोकील या मराठीतल्या अव्वल कथालेखकांच्या कथा, तसेच मेधा पाटकर, नीरजा, दासू वैद्या यांसारख्या मान्यवरांच्या कविता अंकात आहेत. याचबरोबर व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांचे या विषयामधील चिंतन आणि ज्योतिषशास्त्री स्मिता अतुल गायकवाड यांचे राशिभविष्य, असा वैविध्यपूर्ण वाचनाचा फराळ अंकात वाचायला मिळेल.
विशेष काय?
‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’च्या (आरएसएस) शताब्दीनिमित्ताने संघाच्या शतकभराच्या वाटचालीचा वेध घेणारा विशेष विभाग अंकात आहे. त्याचबरोबर उजव्या विचारपंथाला कलामाध्यमाचा ठोस वापर करण्याचे महत्त्व लक्षात आल्यानंतर आपल्या जाणिवांनाही ‘उजवे वळण’ लावले जात आहे. ते कसे, हे सांगणारा खास विभाग अभिजीत ताम्हणे, हेमंत प्रकाश राजोपाध्ये, रवींद्र पाथरे, डॉ. संतोष पाठारे यांनी सजवला आहे.