मुंबई : प्रसिद्धी आणि मदतीची अपेक्षा न बाळगता समाजाने प्रेरणा घ्यावी, असे उल्लेखनीय कार्य विविध क्षेत्रांत स्त्रिया करत आहेत. आपल्या अंगभूत गुणांच्या बळावर स्वत:च्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. स्वत:पुरते मर्यादित न राहता समाजासाठी कार्य करणाऱ्या या यशस्विनींचा शोध घेऊन त्यांचा गौरव करणाऱ्या ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कारा’चे व्यासपीठ खुले झाले आहे.
समाजासाठी सर्वथा प्रेरणादायी ठरणाऱ्या नऊ कर्तृत्ववान स्त्रियांचा ‘लोकसत्ता’तर्फे दरवर्षी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने गौरव केला जातो. त्यासाठी राज्यभरातून कर्तबगार स्त्रियांची नामांकने मागवून त्यातून तज्ज्ञ परीक्षकांची समिती नऊ दुर्गांची निवड करते. त्यांना एका भरगच्च कार्यक्रमात ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार’ दरवर्षी प्रदान केला जातो. गेल्या दहा वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे.
हेही वाचा >>> मुंबई: गोविंदा सराव पथकांना क्रेन, दोरी आणि हुक पुरवणार, सुरक्षेसाठी उपाययोजना; पालकमंत्र्यांचे आदेश
यंदाही शिक्षण, सामाजिक कार्य, आरोग्य, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, कृषी, उद्याोग, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांतील ‘दुर्गां’चा शोध सुरू आहे. ‘दुर्गां’च्या निवडीनंतर नवरात्रीत नऊ दिवस दररोज यातील एका दुर्गेची ‘लोकसत्ता’तून ओळख करून दिली जाणार आहे. तसेच त्यानंतर होणाऱ्या रंगतदार सोहळ्यात नामवंतांच्या हस्ते नवदुर्गांचा सन्मान केला जाणार आहे.
माहिती कुठे पाठवाल?
नामांकने loksattanavdurga2024 @gmail.com या ई-मेल आयडीवर पाठवावीत. टपालाने पाठवायची असल्यास पत्ता पुढीलप्रमाणे- ‘लोकसत्ता- महापे कार्यालय, प्लॉट नं. ईएल- १३८, टीटीसी इंडस्ट्रिअल एरिया, महापे, नवी मुंबई झ्र ४००७१०.
‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार-२०२४’साठी नामांकने पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आपल्यातील कलागुणांचा उपयोग करून समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी अविरत झटणाऱ्या अशा स्त्रियांची माहिती ५ सप्टेंबर पर्यंत पाठवावी.