दरवर्षी हिंदू नववर्षदिनाचे स्वागत अनोख्या पद्धतीने करणाऱ्या ‘चैत्र चाहूल’ने यंदाही आगळ्यावेगळ्या प्रकारे गुढीपाडवा साजरा केला. विविध साहित्यिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांबरोबरच यंदाचे रंगकर्मी आणि ध्यास पुरस्कारही या कार्यक्रमात देण्यात आले. नेपथ्यकार आणि प्रकाशयोजनाकार म्हणून सर्वानाच परिचित असलेल्या प्रदीप मुळ्ये यांना यंदाचा रंगकर्मी, तर चित्रकथी ही पारंपरिक लोककला अजूनही जिवंत ठेवणाऱ्या गणपत मसगे यांना ध्यास पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच पत्रकार व लेखक अभय परांजपे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ यंदापासूनच देण्यात येणारा अभय परांजपे पुरस्कार ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांना देण्यात आला. ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांच्या हस्ते हे सन्मान करण्यात आले.
माटुंग्याच्या यशवंत नाटय़मंदिराबाहेर उभी असलेली गुढी, आमंत्रितांसाठी असलेले कैरीचे पन्हे, चाफ्याचे फुल असा अस्सल मराठमोळा थाट ‘चैत्र चाहूल’ची चाहूल देत होता. ठेवणीतले भरजरी कपडे घालून आलेले आमंत्रित आसनस्थ झाल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली ती बासरी, व्हायोलिन, सिंथेसायझर, तबला, मृदंग, ड्रम यांच्या एकत्रित मेलडीने! मध्यंतरापर्यंत एकापेक्षा एक उत्तमोत्तम कार्यक्रम रंगले. अभिनेता जितेंद्र जोशी याने केलेल्या दि. बा. मोकाशी यांच्या ‘आता आमोद सुनासी आले’ या कथेच्या वाचनानंतर मध्यंतर झाला. जितेंद्रने मोकाशी यांचे शब्द आपल्या आवाजातून जिवंत करून एक दृष्यानुभव लोकांसमोर उभा केला.
मध्यंतरानंतर सत्कार आणि पुरस्कार वितरण सोहळा सुरू झाला. ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांच्या हस्ते प्रदीप मुळ्ये आणि गणपत मसगे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्याशिवाय वामन केंद्रे, अरूण काकडे, कृष्णा मुसळे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. पुरस्कार प्रदान समारंभानंतर विंदा करंदीकर यांनी अनुवादित केलेल्या ‘राजा लियर’ या नाटकातील काही प्रवेश डॉ. शरद भुताडीया यांनी सादर केले.
नववर्षांचे स्वागत ‘चैत्र चाहूल’ने केले!
दरवर्षी हिंदू नववर्षदिनाचे स्वागत अनोख्या पद्धतीने करणाऱ्या ‘चैत्र चाहूल’ने यंदाही आगळ्यावेगळ्या प्रकारे गुढीपाडवा साजरा केला. विविध साहित्यिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांबरोबरच यंदाचे रंगकर्मी आणि ध्यास पुरस्कारही या कार्यक्रमात देण्यात आले.
First published on: 12-04-2013 at 04:35 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta editor girish kuber get abhay paranjape award