|| प्रशांत ननावरे

  • चाफेकर दुग्ध मंदिर आणि रेस्टॉरंट
  • ’ कुठे – ३९५, लॅमिंग्टन रोड, मुंबई- ४
  • ’ कधी – सोमवार ते शनिवार सकाळी ७.३० ते संध्याकाळी ७.३०. रविवार बंद.

पूर्वी मुंबईच्या नाक्यानाक्यांवर इराण्यांची हॉटेलं होती. या हॉटेलांमध्ये मिळणारा चहा लोकांना आवडत असे. आजही आवडतो. पण त्या काळी चहा तब्येतीला चांगला नाही म्हणून दुग्ध मंदिर ही संकल्पना अस्तित्वात आली, असं सांगितलं जातं. त्यातूनच वासुदेव गोविंद चाफेकर यांनी १९२८ साली चाफेकर दुग्ध मंदिर सुरू केलं. या दुग्ध मंदिरांमध्ये वा मराठी उपाहारगृहांमध्ये गावाहून शहरात आलेले भिक्षुक काम करीत असत. शांताराम मोघे हेही त्यांपैकीच एक. गिरगांवातील काका तांबेंकडे शांताराम कामाला होते. त्यानंतर ते शेअर मार्केटच्या समोर असलेल्या हॉटेल ललितमध्ये मॅनेजर म्हणून रुजू झाले. त्याच काळात आपटे नावाचे गृहस्थ ‘चाफेकर’ चालवायचे. १९६४ साली वासुदेव चाफेकर वारले. त्यानंतर काही काळ हे हॉटेल बंद होतं. त्यानंतर १९६७ साली शांताराम मोघेंनी चाफेकर चालवायची परवानगी मागितली. ती मिळाली, पण एकाच अटीवर ‘चाफेकर’ हे नाव बदलायचं नाही.

चाफेकरमध्ये १९२८ पासून दुग्धजन्य आणि उपवासाचे पदार्थ मिळतात. तेव्हा कुठल्याच पदार्थामध्ये कांदा-लसूणही टाकली जात नसे. साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा, बटाटा पुरी, दुधी हलवा, दुधी वडी, श्रीखंड वडी, दूध हे सर्व प्रकार इथे सुरुवातीपासून मिळतात. १९६७ साली .मौघेंकडे हॉटेलची मालकी आल्यावर पदार्थामध्ये कांदा-लसूण आणि चहा सुरू झाला.

आजही मराठी पदार्थाची ओळख म्हणून ‘चाफेकर’ नाव टिकवून आहे. बटाटा पुरी, साबुदाणा वडा, साबुदाणा खिचडी, उपवासाची मिसळ, थालीपीठ, भाजणीचं थालीपीठ, बटाटा वडा, कोंथिबीर वडी हे गेल्या ९० वर्षांपासून इथे मिळतात. पदार्थ बनवण्याची पद्धत आणि त्यात वापरले जाणारे जिन्नस सारखेच असल्याने चवीचा ठेवा आजही कायम आहे.

इथल्या प्रत्येक पदार्थाची चव वेगळी. मग ते उपवासाचे पदार्थ असोत वा भाज्या. कारण प्रत्येक गोष्टीत वेगवेगळा मसाला पडतो. हे सर्व मसाले वर्षांनुवर्षे विशिष्ट पद्धतीने तयार करून घेतले जातात. दिनदर्शिकेनुसार आता उपवासांचं काटेकोर पालन केलं जात नाही. त्यामुळे वर्षभर सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार या दिवशी उपवासाचे सर्व पदार्थ मिळतात.

१९७५ च्या आधी चाफेकरची ‘नाष्टा प्लेट’ प्रसिद्ध होती. सहा खणांच्या थाळीमध्ये दोन साध्या पुऱ्या, भाजी, पोहे, मटकीची उसळ, चटणी आणि शिरा असे पदार्थ दिले जात असत. आता सर्व जण ‘कॉम्बो’ म्हणून नवीन शोध लागल्याची जी शेखी मिरवतात त्याची सुरुवात मुंबईत खरं तर ‘चाफेकर’ने केलेली आहे. ‘नाष्टा प्लेट’चं रूपांतर आता उपवासाच्या थाळीत करण्यात आलंय. बटाटय़ाची सुकी भाजी, राजगिरा पुरी, मसाला केळी, खिचडी, शेंगदाणा उसळ, बटाटय़ाचा शिरा, शेंगदाण्याची चटणी अशी भरगच्च उपवासाची थाळी आता येथे मिळते.

मसाला केळी हा प्रकार हल्ली क्वचितच खायला मिळतो, पण ‘चाफेकर’मध्ये तो तुम्हाला नक्की मिळेल. मसाला केळी बनविण्यासाठी बाजारातून थोडी पिकलेली केळी आणली जातात. खोबरं, वेलची, केसर आणि साखर यांचं सारण बनवून केळी भरली जातात. नंतर त्यांना साजूक तुपामध्ये परतवलं जातं. खमंग काकडी आणि रताळ्याचा शिरा हेदेखील असेच नामशेष झालेले पदार्थ. पण ‘चाफेकर’मध्ये ते जरूर चाखायला मिळतील.

पूर्वी ग्रॅण्ट रोड परिसरात भरपूर थिएटर होती, त्यामुळे रात्री उशिरापर्यंत लोक असायचे. पण आता संपूर्ण शहरच पश्चिम उपनगराकडे सरकत असल्याने आता या भागाची सगळी रयाच गेलेली आहे. लॅमिंग्टन रोडच्या पट्टय़ात पूर्वी २० ते २५ हॉटेलं होती आणि ती सर्व चालायची. पण आता केवळ दोनच शिल्लकराहिली आहेत. त्यापैकी ‘चाफेकर’ अजूनही उभं आहे.

@nprashant

nanawareprashant@gmail.com

Story img Loader