करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने पार पडत आहे. या वर्षी उंच मूर्ती नसतील, मंडपात कार्यकर्त्यांची लगबग नसेल, दर्शनाला आलेल्या भक्तांच्या रांगा नसतील. पण ‘लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पर्धा’ या वर्षीही न चुकता होणार आहे. फक्त स्पर्धेचे स्वरूप वेगळे असेल. यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या गणेशमूर्तीची छायाचित्रे ‘लोकसत्ता’ला पाठवायची आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरवर्षी ‘लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पर्धे’त सहभागी मंडळांची मूर्ती, कला दिग्दर्शन, देखावा, संहिता लेखन, आरास, इत्यादी गोष्टींचे परीक्षण करून उत्कृष्ट मंडळांची निवड केली जाते. यंदाच्या स्पर्धेत मंडळांच्या गणेशमूर्तीनाच सर्वाधिक महत्त्व आहे. मंडळांनी आपली मूर्ती सर्व बाजूंनी दिसेल अशा प्रकारची ५-६ छायाचित्रे ई-मेलद्वारे २४ ऑगस्टपर्यंत पाठवायची आहेत. यासोबत मंडळाचे नाव, पत्ता, मूर्तिकाराचे नाव, अध्यक्ष, सरचिटणीस यांचे नाव आणि संपर्क  क्रमांक छायाचित्रासोबत जोडावेत. कुलाबा ते अंधेरी, जोगेश्वरी ते दहिसर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मुलुंड, ठाणे शहर, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई (शहर) या विभागांतील मंडळे स्पर्धेत सहभागी होऊ  शकतील.

प्रत्येक विभागातून तीन मूर्ती निवडल्या जातील. विजेत्या मंडळांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येईल. ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सर्वोत्कृष्ट पर्यावरणस्नेही मूर्ती’ म्हणून एका मंडळाला सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येईल. सर्व मंडळे सरकारने घालून दिलेल्या नियमांना बांधील असतील. त्यात काही तफावत आढळल्यास मंडळाला स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. स्पर्धेसाठी नियम व अटी लागू आहेत.

छायाचित्रे पाठवण्यासाठी ईमेल आयडी -loksatta.gums2020@gmail.com

संपर्क  – धर्मेश म्हसकर – ९७७३१५४९२४