महाराष्ट्रात होत असलेल्या बदलांचा वेध घेण्यासाठी ‘लोकसत्ता’ आणि ‘सारस्वत बँके’ने सुरू केलेल्या ‘बदलता महाराष्ट्र’ या विशेष उपक्रमाच्या ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दुसऱ्या पर्वाचा प्रारंभ ‘अर्धनागरीकरणाचे आव्हान’ या चर्चासत्राने होत आहे. नियोजनशून्य नागरीकरणामुळे राज्यातील सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक परिस्थितीवर होत असलेले परिणाम आणि उपाययोजना-पर्यायांचा ऊहापोह या चर्चासत्रात होणार आहे.
देश स्वतंत्र झाल्यानंतर सर्वाधिक नागरीकरण झालेल्या राज्यांपैकी एक अशी ओळख असलेल्या महाराष्ट्रात सध्या महानगरे, शहरे अस्ताव्यस्तपणे फुगत चालली आहेत. २१ वे शतक हे नागरीकरणाचे शतक म्हणून संबोधले जात असताना महाराष्ट्रासारख्या पुरोगामी आणि प्रगत राज्याच्या नागरीकरणाच्या प्रक्रियेला मात्र कसलेही नियोजन नाही, असे चित्र निर्माण झाले आहे. या पाश्र्वभूमीवर ‘बदलता महाराष्ट्र’ उपक्रमात अर्धनागरीकरणामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा आणि त्यावरील उपायांचा विचार होणार आहे.
दोन दिवसांच्या या पर्वातील प्रत्येकी तीन परिसंवादांत नागरीकरणाच्या वेगवेगळय़ा पैलूंवर चर्चा होईल. ३० ऑक्टोबर रोजी ‘अशास्त्रीय नागरीकरणाचे परिणाम’ या विषयावरील परिसंवादाने चर्चासत्राची सुरुवात होईल. नागरी लोकसंख्या वाढत असताना नियोजनबद्ध नागरीकरण होण्याऐवजी बेबंद नागरीकरण सुरू आहे. त्यामुळे विद्यमान महानगरांमधील नागरी सुविधा कोलमडत आहेत. वेडय़ावाकडय़ा नागरीकरणामुळे अनेक शहरांचा तोंडवळा ना धड ग्रामीण ना धड शहरी असा अर्धनागरी झाला आहे. त्याचा परिणाम शहरांमधील सामाजिक परिस्थिती-संतुलन, पर्यावरण बदलत आहे. त्यामुळे आरोग्याचे प्रश्न, शिक्षणाचे प्रश्नही निर्माण झाले आहेत. शहराच्या विकासावरही परिणाम होत आहे. या सर्व मुद्दय़ांचा धांडोळा या सत्रात घेण्यात येईल.