‘लोकसत्ता गप्पा’ उपक्रमाचे दुसरे पुष्प येत्या शनिवारी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ. भैरप्पा आणि मुंबई-पुण्यासह राज्याच्या विविध भागांतून आलेल्या साहित्यप्रेमी मान्यवरांच्या मनमोकळ्या गप्पाष्टकानंतर आता ‘लोकसत्ता’च्या ‘लोकसत्ता गप्पा’ या उपक्रमात रसिकजनांशी सूरसंवाद साधण्यासाठी येत आहेत पंडित सत्यशील देशपांडे. आपल्या जादूई स्वरांनी रसिकमनांस तृप्ततेचा सुखानुभव देणाऱ्या या ज्येष्ठ मैफली कलावंताशी, संगीतज्ज्ञ लेखक-पंडिताशी मनसोक्त संवाद साधण्याची संधी लाभणार आहे येत्या शनिवारी, २३ जुलै रोजी.

गेली सुमारे चार दशके भारतीय अभिजात संगीताच्या क्षेत्रात पंडित सत्यशील देशपांडे यांनी विविध प्रयोगांद्वारे आपली ओळख निर्माण केली आहे. पंडित कुमार गंधर्व यांच्याकडून मिळालेली तालीम त्यांच्यासाठी घरंदाज गायकीचा संस्कार अधिक दृढ करणारी ठरली. ‘कलेचे गूढरम्य प्रदेश हे शास्त्र-व्याकरणाच्या सीमेला चिकटून तिथेच असतात. या सीमेवर एकामागून एक येणाऱ्या आवर्तनाची शृंखला गायक आपले संस्कार, आपली तत्काळ स्फूर्तता आणि आपली कलाकारी वापरून आंदोलित करीत राहतो..’ हा गुरुमंत्र घेऊन परतलेल्या या कलावंताने त्यानंतरच्या काळात आपल्यातील सर्जनाचा सतत शोध घेतला. त्यातून जे गवसले, ते गायनातून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला.  अभिजात संगीताच्या क्षेत्रातील अनेक दिग्गजांबरोबर संवाद साधण्याची संधी मिळालेले सत्यशीलजी हे एक कलावंत आहेत. कलेच्या क्षेत्रातील सर्वात अवघड वाटावी, अशी सर्जनाची प्रक्रिया शब्दातून उलगडून दाखवण्याची किमयाही त्यांना साधली आहे. आपले गायन हीच आपल्या कलेची खरी ओळख असते, यावर विश्वास असल्याने ते सततच्या चिंतनातून संगीताकडे नूतनतेने पाहण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यांच्या या प्रवासातील अनुभव आणि त्यांचे चिंतन या स्वरसंवादातून समजून घेण्याची संधी मिळणार आहे.

आपापल्या क्षेत्रातील मातब्बरांबरोबर थेट गप्पा मारतानाच, विचारांचे आदान-प्रदान व्हावे या हेतूने ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या आणि ‘केसरी ट्रॅव्हल्स’ प्रायोजक असलेल्या ‘लोकसत्ता गप्पा’ या उपक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. भैरप्पा यांच्या साहित्यगप्पांनी झाले होते. या उपक्रमातील हा दुसरा कार्यक्रम आहे. पंडित सत्यशील देशपांडे यांच्याबरोबरचा हा स्वरसंवाद केवळ निमंत्रितांसाठीच आहे.