मंत्रिमंडळातून हकालपट्टी झाल्यापासून एकनाथ खडसे यांचा संताप काही कमी झालेला नाही. आपले मंत्रिपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच गेल्याने नाथाभाऊंचे लक्ष्य अर्थातच फडणवीस आहेत. दोन दिवसांपूर्वी ‘त्यांचे’ थोबाड फुटले, असे नाथाभाऊंनी सांगितले होते. आता ‘त्यांचे’ म्हणजे कोणाचे हे गुलदस्त्यातच राहिले. कलंकित मंत्र्यांच्या विरोधातील चर्चेत भाग घेताना खडसे यांनी भावनांना वाट करून दिली. आपले कोणी ऐकत नाही वा कोणाशी बोलायचे हेच कळत नाही, अशी व्यथा त्यांनी मांडली. लक्ष्य अर्थातच मुख्यमंत्री होते. मग खडसे यांना विरोधी बाकांवरून उत्तेजन मिळत गेले. खडसे यांची टोलेबाजी सुरू असतानाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी एक चिठ्ठी खडसे यांना पाठविली. भाषण सुरू असताना शिपाई ही चिठ्ठी घेऊन गेला, तेव्हा खडसे यांनी या चिट्ठीकडे न बघितल्यासारखेच केले. काही वेळातच मुख्यमंत्री सभागृहाबाहेर निघून गेले. मुख्यमंत्र्यांनी खडसे यांना पाठविलेल्या चिठ्ठीत नेमके काय दडले होते किंवा चिठ्ठी पाठविल्यावर मुख्यमंत्री लगेचच सभागृहाबाहेर का पडले, याचे विविध तर्कवितर्क मांडले जाऊ लागले. एक मात्र झाले, खडसे यांनी मनातील भावनांना वाट करून देताना मुख्यमंत्र्यांची चांगलीच अडचण केली. आधीच बाहेरचा रस्ता दाखवून मुख्यमंत्र्यांनी खडसे यांना योग्य तो संदेश दिला आहे. आता अधिक बोलले तर काय, अशी कुजबुज भाजपच्या आमदारांमध्ये सुरू झाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा