अत्यंत उत्साहपूर्ण आणि चुरशीच्या वातावरणात रंगलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत औरंगाबादच्या ‘भक्षक’ या एकांकिकेने बाजी मारली. शहरीकरणासाठी होणारी जंगलाची कत्तल आणि त्यामुळे वन्यजीवांवर होणारे परिणाम असा संघर्ष दाखविणाऱ्या या एकांकिकेने प्रभावी सादरीकरणासह विजेतेपदावरही मोहोर उमटवली. नगरच्या ‘ड्रायव्हर’ आणि मुंबईच्या’एक्स-प्रीमेंट’ या एकांकिकांनी अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या सर्वोत्कृष्ट एकांकिकेचा मान मिळवला. ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्या हस्ते ‘भक्षक’ला ‘लोकांकिके’चा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तत्पूर्वी महेश एलकुंचवार यांनी नव्या दमाच्या रंगकर्मींशी मनमोकळा संवाद साधला. लेखन, संगीत आणि सादरीकरण हे नाटकातील महत्त्वपूर्ण घटक कसे असावेत, याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. महाअंतिम फेरीसाठी परीक्षक म्हणून आनंद इंगळे, परेश मोकाशी, राजन भिसे, प्रतिक्षा लोणकर आणि अभिराम भडकमकर यांनी काम पाहिले.
मुंबईच्या रवींद्र नाट्यमंदिरात रंगलेल्या महाअंतिम फेरीत राज्यभरातील आठ केंद्रांतून निवडण्यात आलेल्या आठ महाविद्यालयांच्या एकांकिका सादर करण्यात आल्या. यामध्ये मुंबईची ‘एक्स्प्रिमेंट’, ठाण्याची ‘मित्तर’, नाशिकची ‘व्हॉट्स अॅप’, पुण्याची ‘जार ऑफ एल्पिस’, औरंगाबादची ‘भक्षक’, नगरची ‘ड्रायव्हर’, रत्नागिरीची ‘भोग’ की नागपूरची ‘विश्वनटी’ या आठ दर्जेदार एकांकिकांचा समावेश होता. या स्पर्धेत राज्यभरातील १३३ महाविद्यालयांनी भाग घेतला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा