नाटकवेडय़ा तरुणांच्या प्रयोगशीलतेला साद घालणाऱ्या, त्यांच्या नाटय़प्रतीभेला खुला मंच उपलब्ध करून देणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचे पडघम वाजू लागले आहेत. २६ नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या या स्पर्धेसाठी सज्ज होण्याची वेळ आता आली आहे. स्पर्धेसाठीचे प्रवेश अर्ज उपलब्ध झाले असून ते त्वरित भरून ‘लोकांकिका’च्या रंगमैदानावर नाटय़विष्कारासाठी स्थान निश्चित करण्याची जबाबदारी आता तुमच्यावर आहे! नवीन विचार, नवी मांडणी, नवे प्रयोग, सळसळती ऊर्जा या सगळ्यांच्या अजब मिश्रणातून रंगणाऱ्या ‘सॉफ्टकॉर्नर’ प्रस्तुत, ‘केसरी’ सहप्रायोजित ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेला विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. रंगभूमीवर नवे काही सांगू पाहणाऱ्या राज्यभरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने तीन वर्षांपूर्वी ‘लोकसत्ता’ने या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची सुरुवात केली. पहिल्याच वर्षी राज्यभरातील २००हून अधिक महाविद्यालयांनी आपल्या एकांकिका प्राथमिक फेरीत सादर करत या स्पर्धेचे जंगी स्वागत केले होते. ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या व्यासपीठावर पूर्ण तयारीनिशी आपले नाटय़विचार घेऊन उतरणाऱ्या तरुणाईने या स्पर्धेला आपलेसे केले आहे. त्याच आपलेपणाने २६ नोव्हेंबरला ‘अस्तित्व’च्या सहकार्याने ‘लोकांकिका’ स्पर्धेची कवाडे नाटय़वेडय़ांसाठी खुली होणार आहेत. यंदाही सर्वोत्तम ठरणाऱ्या गुणवंतांना मालिका-चित्रपटातून संधी देण्यासाठी ‘आयरिस प्रॉडक्शन’ हे या स्पर्धेचे टॅलेंट पार्टनर आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा