मराठी एकांकिका स्पर्धेच्या वर्तुळात मानाचे स्थान निर्माण केलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या महाअंतिम सोहळ्याचे प्रसारण १७ जानेवारी रोजी दुपारी एक वाजता ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘नक्षत्र’ या कार्यक्रमात केले जाणार आहे.
‘लोकसत्ता’ने सुरु केलेल्या या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेला यंदाही भरघोस प्रतिसाद मिळाला होता. ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यलयीन एकांकिका स्पर्धेच्या निमित्ताने २९ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान राज्यभर जल्लोष सुरू होता.
राज्यभरातील आठ केंद्रांवर पार पडलेल्या फेऱ्यांमधून प्रतयेक केंद्रावरील सर्वोत्तम आठ एकांकिकांची महाअंतिम फेरी १७ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिर येथे महाअंतिम फेरी रंगली होती.
राज्याच्या विविध भागांतील विभिन्न सामाजिक, आर्थिक आणि राजकीय पाश्र्वभूमीसह वाढणारे हे तरुण वेगवेगळ्या विषयांकडे कसे पाहतात, याचा जणू कॅलिडोस्कोप या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळाला होता. या सोहळय़ाचे प्रसारण ‘झी मराठी’वर केले जाणार आहे.
सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत ‘लोकसत्ता लोकांकिका’चे ‘पृथ्वी एडिफीस’ हे सहप्रायोजक आहेत. ‘स्टडी सर्कल’ हे नॉलेज पार्टनर, पॉवर्डबाय ‘केसरी’, ‘झी मराठी’ नक्षत्र टेलिव्हीजन पार्टनर, सपोर्टेट बाय ‘अस्तित्व’, ‘आयरिस’ हे टॅलेंट पार्टनर आहेत.