मुंबई : युवा रंगकर्मींच्या कल्पनाशक्तीला चालना देणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धेच्या मुंबई विभागीय प्राथमिक फेरीच्या दुसऱ्या टप्प्यातही विषयांचे वैविध्य पाहायला मिळाले. विविध सत्य घटनांवरून प्रेरित होऊन मानवी भावभावनांचा वेध घेणाऱ्या आणि सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या एकांकिकांचे युवा रंगकर्मींनी सादरीकरण केले. चुरशीच्या ठरलेल्या प्राथमिक फेरीतून एकूण पाच एकांकिकांनी मुंबई विभागीय अंतिम फेरीत धडक मारली. माटुंगा रोड (पश्चिम) येथील यशवंत नाट्य मंदिर येथे शुक्रवार, १३ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजल्यापासून मुंबई विभागीय अंतिम फेरी रंगणार आहे.
मुंबई विभागीय प्राथमिक फेरीच्या परीक्षणाची धुरा ही दिग्दर्शक गिरीश पतके आणि नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनी सांभाळली. मुंबई विभागीय प्राथमिक फेरीच्या दुसऱ्या टप्प्यातही युवा रंगकर्मींनी विविधांगी विषयांवर भर देत लक्षवेधी सादरीकरण केले.
हेही वाचा >>>मुंबईच्या किमान तापमानात घट
‘लोकसत्ता लोकांकिका’ ही स्पर्धा तरुणाईला नेहमीच आकर्षित करत आली असून दर्जेदार एकांकिकांमुळे चुरशीची ठरली आहे. त्यामुळे यंदा मुंबई विभागीय अंतिम फेरीत कोणत्या महाविद्यालयाची एकांकिका अव्वल ठरते, याकडे नाट्यवर्तुळाचे लक्ष लागले आहे. या स्पर्धेची मुंबई विभागीय अंतिम फेरी शुक्रवार, १३ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजल्यापासून माटुंगा रोड (पश्चिम) येथील यशवंत नाट्य मंदिर येथे रंगणार आहे. याचठिकाणी रसिकप्रेक्षकांसाठी नि:शुल्क प्रवेशिका विभागीय फेरी सुरु होण्याच्या अर्धा तास आधी उपलब्ध असतील. एका व्यक्तीला एकच प्रवेशिका देण्यात येईल.
विभागीय अंतिम फेरीसाठी निवडलेल्या एकांकिका
● जुगाड लक्ष्मी : गुरु नानक खालसा स्वायत्त महाविद्यालय
● ब्रह्मपुरा : महर्षी दयानंद महाविद्यालय
● अविघ्नेया : सिडनहॅम महाविद्यालय
● जनता नगरचे लंगडे घोडे : रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालय
● पोर्ट्रेट : सर ज. जी. कला, वास्तुकला आणि अभिकल्प विद्यापीठ
युवा रंगकर्मींनी प्रचंड तयारीनीशी वैविध्यपूर्ण विषयांवर भर देत एकांकिकांची मांडणी केलेली पाहायला मिळाली. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि ऊर्जा वाखण्याजोगी होती. – संदेश बेंद्रे, नेपथ्यकार (परीक्षक)
‘लोकसत्ता लोकांकिकाह्णह्ण ही स्पर्धा महाविद्यालयीन रंगकर्मींसाठी एक महत्वाचे व्यासपीठ आहे. महाविद्यालयीन रंगकर्मींचा नाट्यविषयक अभ्यास वाढण्याच्या उद्देशाने यंदा आयोजित करण्यात आलेला ’रंगसंवादह्णह्ण हा वेबिनार अत्यंत उपयुक्त ठरला. त्यामुळे दर्जेदार एकांकिकांचे सादरीकरण मुंबई विभागीय प्राथमिक फेरीत पाहायला मिळाले. – गिरीश पतके, (परीक्षक)
मी गेल्या अनेक वर्षांपासून लोकसत्ता लोकांकिका पाहत आहे. विद्यार्थी हे विषयाची निवड करण्यापासून लेखन, दिग्दर्शन, रंगमंच व्यवस्था व उत्तम अभिनयासह उत्कृष्ट सादरीकरण करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. – रोहिणी परळकर, आयरिस प्रोडक्शन्स
प्रायोजक
●मुख्य प्रायोजक : जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण
●सहप्रस्तुती : सॉफ्ट कॉर्नर
●सहप्रायोजक : झी टॉकीज, केसरी टूर्स, भारती विद्यापीठ
●पॉवर्ड बाय : एन एल दालमिया, फ्यूजनफ्लिक्स
●साहाय्य : अस्तित्व
●टॅलेंट पार्टनर : आयरिस प्रोडक्शन्स