मुंबई : ‘लोकसत्ता लोकांकिका’ या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीची राज्यातील आठ विविध केंद्रांवर धामधूम सुरू असून, तरुण रंगकर्मीच्या सहभागाने वातावरण चैतन्यमय झाले आहे. या महाविद्यालयीन नाटय़कलावंतांचा रंगाविष्कार पाहण्यासाठी प्रसिध्द रंगभूमी आणि चित्रपट अभिनेते, लेखक, दिग्दर्शक सौरभ शुक्ला हे ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या १६ डिसेंबरच्या महाअंतिम सोहळय़ाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
‘लोकसत्ता लोकांकिका’ या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेऱ्यांना शनिवारपासून पुणे आणि कोल्हापूर येथून मोठय़ा जल्लोषात सुरूवात झाली. अन्य सहा केंद्रांवरही तालमींना रंगल्या आहेत. युवा सर्जनशील कलावंतांना नाटय़ाविष्काराची संधी देत त्यांना कलाक्षेत्रातील व्यावसायिक संधींचे दालन खुल्या करून देणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या महाअंतिम सोहळय़ाला लाभणारी वलयांकित कलावंतांची उपस्थिती हा दरवर्षी उत्सुकतेचा विषय असतो. यंदा ‘सत्या’ चित्रपटातील कल्लूमामा ही व्यक्तिरेखा गाजवणारे अभिनेते आणि याच चित्रपटातून मुंबईच्या अधोविश्वाची एक वेगळी बाजू प्रेक्षकांसमोर आणणारे लेखक सौरभ शुक्ला हे प्रमुख पाहुणे म्हणून ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या मंचावर उपस्थित राहणार आहेत.
सौरभ शुक्ला यांनी १९८६ मध्ये ‘व्ह्यू फ्रॉम द ब्रिज’, ‘लूक बॅक इन अँगर’, ‘घाशीराम कोतवाल’, ‘हयवदन’ सारख्या नाटकांतून काम करत अभिनयाच्या कारकिर्दीला सुरूवात केली. नाटकातून भूमिका करत असताना त्यांना दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याकडून ‘बँडिट क्वीन’ चित्रपटासाठी विचारणा झाली. रंगभूमीवरून रुपेरी पडद्यापर्यंत नेणारा हा त्यांचा पहिला चित्रपट ठरला. १९९८ साली त्यांनी लिहिलेला ‘सत्या’ हा रामगोपाल वर्मा दिग्दर्शित चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या यशामुळे त्यांना ओळख मिळाली. त्याचा योग्य उपयोग करून घेत लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून त्यांनी स्वत:ला सिद्ध केले आहे. या हरहु्न्नरी अभिनेत्याचा जीवनप्रवास, अभिनय-लेखन क्षेत्रातील त्यांचा अनुभव त्यांच्याच तोंडून ऐकण्याची संधी ‘लोकसत्ता लोकांकिका’ महाअंतिम सोहळय़ात मिळणार आहे.
प्राथमिक फेऱ्या अशा.. २९ आणि ३० नोव्हेंबरला नागपूर विभागाची प्राथमिक फेरी रंगेल. मुंबई, ठाणे व नाशिकची प्राथमिक फेरी २ आणि ३ डिसेंबर, तर रत्नागिरी आणि छत्रपती संभाजीनगर विभागाची प्राथमिक फेरी ४, ५ डिसेंबरला होईल.
मुख्य प्रायोजक
’सॉफ्ट कॉर्नर
सहप्रायोजक
’भारती विद्यापीठ, पुणे
’शिवरत्न शिक्षण संस्था, अकलूज संचलित विजयसिंह मोहिते-पाटील कॉलेज ऑफ नर्सिग अॅण्ड मेडिकल रिसर्च इन्स्टिटय़ूट
पॉवर्ड बाय
’केसरी टूर्स
’शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघ मर्या, विजयनगर-अकलूज, ता. माळशिरस जि. सोलापूर
’श्री नेमिनाथ ज्वेलर्स
साहाय्य
’अस्तित्व
टॅलेंट पार्टनर
’आयरिस प्रॉडक्शन