महाविद्यालयीन तरुणांच्या सर्जनशीलतेला वाव देणारी, नव्या प्रयोगांना दाद देणारी ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेची राज्यातील आठ केंद्रांवरील विभागीय अंतिम फेरी पार पडली असून आता महाअंतिम फेरी शनिवार, २० डिसेंबर रोजी मुंबईत होणार आहे. विषय आणि मांडणीतील नवनव्या प्रयोगांतून मराठी रंगभूमीला नव्या उंचीवर नेणाऱ्या ज्येष्ठ दिग्दर्शक विजया मेहता यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार असून सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पुणे, नगर, औरंगाबाद, नाशिक, नागपूर या आठ केंद्रांवर ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत व ‘भारतीय आयुर्विमा महामंडळा’च्या सहकार्याने सुरू असलेली ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धा सुरू आहे. प्राथमिक फेरी आणि विभागीय अंतिम फेरीतून प्रत्येक केंद्रावरून एक एकांकिका अशा रीतीने आठ एकांकिका महाअंतिम फेरीसाठी निवडण्यात आल्या आहेत. या आठ एकांकिकांमधून राज्याची ‘लोकसत्ता लोकांकिका-२०१४’ निवडली जाणार आहे.
प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़मंदिरात महाअंतिम फेरी रंगणार आहे. सायंकाळी समारंभपूर्वक पुरस्कार वितरण होईल. या वेळी विजया मेहता यांचे मार्गदर्शन ऐकायची संधी तरुण कलाकार-प्रेक्षकांना मिळणार आहे. मराठी सिने-नाटय़सृष्टीतील नामवंत कलाकार-दिग्दर्शक या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

Story img Loader