तरुण रंगकर्मीच्या अमाप उत्साहाला, कल्पनाशक्तीला आव्हान देणाऱ्या सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेची मुंबई केंद्राची प्राथमिक फेरी शुक्रवारी सकाळी दहापासून प्रभादेवीच्या पु. ल. देशपांडे कला अकादमीत रंगेल. अस्तित्व संस्थेच्या सहकार्याने होणाऱ्या या स्पर्धेचे इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रायोजकत्व झी मराठीकडे आहे. आयरिस प्रॉडक्शन या टॅलेंट पार्टनरचे प्रतिनिधी या नाटय़वेडय़ा तरुणांची प्रतिभा हेरण्यासाठी स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित असतील. मुंबई विभागातील प्राथमिक फेरीत मुंबईतील २० महाविद्यालये एकांकिका सादर करतील.
राज्यभरातील नाटय़वेडय़ा तरुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि रंगभूमीवरील नवनवीन प्रयोग संपूर्ण राज्यासमोर यावेत, या उद्देशाने ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. राज्यभरातून शंभराहून अधिक महाविद्यालयांनी या स्पर्धेसाठी अर्ज भरले. यापैकी २० अर्ज तर फक्त मुंबईतूनच आले. या २० महाविद्यालयांमधून पाच एकांकिकांची निवड मुंबई केंद्राच्या अंतिम फेरीसाठी होईल. अंतिम फेरी १४ डिसेंबर रोजी दादरच्या स्वा. सावरकर स्मारक सभागृहात रंगेल.
सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या मुंबईतील प्राथमिक फेरीसाठी विश्वास सोहनी, भालचंद्र झा, डॉ. अनिल बांदिवडेकर आणि विजय निकम परीक्षणाची जबाबदारी पार पाडतील; तर आयरिस प्रॉडक्शनच्या सुवर्णा मंत्री आणि कार्तिक केंद्रे या नाटय़वेडय़ा महाविद्यालयीन तरुणांमधील गुणवत्तेला योग्य कोंदण देण्यासाठी उपस्थित असतील.

सहभागी महाविद्यालये :
व्हीपीएमआरझेड शहा, डॉ. टी. के. टोपे रात्र महाविद्यालय, डॉ. आंबेडकर (वडाळा), एल्फिन्स्टन, एमडी, साठय़े, आर. ए. पोदार आयुर्वेदिक महाविद्यालय, सिडनहॅम, चेतना, एमपीएसपी सिंग (वांद्रे), मिठीबाई,
पाटकर-वर्दे, म. ल. डहाणूकर, वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, व्हीजेटीआय,
के. जे. सोमय्या, डीटीएसएस महाविद्यालय, एमसीसी, इस्माइल युसूफ महाविद्यालय,
कीर्ती महाविद्यालय.

Story img Loader