महाविद्यालयीन तरुणांच्या सर्जनशील प्रयोगांमुळे रंगकर्मीमध्ये चर्चेचा विषय ठरलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेची मुंबई केंद्रावरील विभागीय अंतिम फेरी रविवार, १४ डिसेंबर रोजी होत आहे. प्राथमिक फेरीतून विभागीय अंतिम फेरीसाठी निवडलेल्या सहा एकांकिकांमध्ये महाअंतिम फेरीत जाण्यासाठी लढत रंगणार आहे. त्यामुळे रविवारी कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे.
‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत व ‘भारतीय आयुर्विमा महामंडळा’च्या सहकार्याने आयोजित या एकांकिका स्पध्रेला ‘अस्तित्व’ संस्थेचे सहकार्य आहे. ‘झी मराठी’ वाहिनी या स्पर्धेची इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रायोजक आहे. ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेची मुंबई विभागीय अंतिम फेरी रविवारी सकाळी दहा वाजल्यापासून दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सभागृहात होणार आहे.
मुंबईतील वीस महाविद्यालये, वीस एकांकिका आणि शंभर-दीडशे सर्जनशील तरुण कलाकारांच्या सळसळत्या उत्साहात पार पडलेल्या प्राथमिक फेरीतून ‘ब्लॅक वॉटर’ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, वडाळा), ‘समांतर’ (महर्षी दयानंद महाविद्यालय, परळ), ‘डज नॉट एक्झिस्ट’ (कीर्ती महाविद्यालय, दादर), ‘एडीबीसी’ (मिठीबाई कला महाविद्यालय, विलेपार्ले), ‘बीइंग सेल्फिश’ (एम. एल. डहाणूकर वाणिज्य महाविद्यालय), ‘दस्तुरखुद्द’ (साठय़े महाविद्यालय) या सहा एकांकिकांची निवड परीक्षकांनी विभागीय अंतिम फेरीसाठी केली होती. आता या सहा एकांकिकांमधून एकच एकांकिका राज्यस्तरीय महाअंतिम फेरीसाठी पात्र ठरणार असल्याने विभागीय अंतिम फेरी अत्यंत चुरशीची असणार आहे.
विभागीय अंतिम फेरीसाठी ज्येष्ठ नाटय़ समीक्षक कमलाकर नाडकर्णी, लेखिका-समीक्षक शांता गोखले आणि नाटककार अशोक पाटोळे ही नामवंत मंडळी परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत, तर ज्येष्ठ दिग्दर्शक व राष्ट्रीय नाटय़ विद्यालयाचे (एनएसडी) संचालक वामन केंद्रे यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार देण्यात येतील. या एकांकिका स्पर्धेसाठी प्रेक्षकांना प्रवेशिकेच्या आधारावर ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर प्रवेश देण्यात येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा